Monthly Archives: March 2013

तारे जमीन पर – Published in Sunday Sakal

                     तारे जमीन पर 

                                                  डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

दोन  वर्षा पूर्वीची गोष्ट. माझ्यासमोर स्वरा बसली होती. वय वर्षे ६. अतिशय गोंडस, लाघवी पण थोडी जास्त चुळबुळ करणारी. टेबल वरच्या पेपर वेट, पेन्स, टाचण्या वगैरे घेऊन काहीतरी आकार बनवण्यात मग्न. स्वत:च्याच विश्वात हरवलेली. आत्ममग्न. तीचं  ते हरवून जाऊन निर्मिती करणं सुद्धा बघत रहाव इतकं गोड होतं. तिच्या शेजारी बसलेली तिची आई अस्मिता मात्र चिंतातूर, व्याकूळ. ” सर, सगळे प्रयत्न करून झाले, रागवून झालं, प्रेमानं समजावून झालं, शिक्षा करून झाली. पण काहीही प्रगती नाहीय हीच्यात. ना धड नीट लिहिता येतं  ना धड वाचता येतं. साधे साधे शब्दोच्चार सुद्धा चुकतात. गणिताच्या नावानं शंख. निर्बुद्ध आहे म्हणावं तर मॉडेल्स बनवणं कसं जमतं? कुठलंही चित्र पहाते आणि तंतोतंत मॉडेल बनवते. पण त्यानं  काय भविष्य बनणार आहे का हिचं ? आतून तुटत चाललोय आम्ही दोघं ? शाळेतून तक्रारींवर तक्रारी. “. मी म्हटलं “तुम्ही आधी शांत व्हा. आपण मुळात प्रॉब्लेम काय आहे हे समजावून घेऊ. मार्ग नक्की काढता येईल. तिच्या काही चाचण्या करूया. पुढच्या आठवड्यात भेटू तेंव्हा सगळं स्पष्ट होईल.” आमचं बोलणं संपेपर्यंत छोट्या स्वराने एक छानसा मासा बनवला होता आणि शेजारी टाचणी ला रबर लावून एक गळ पेपरवेट वर टांगता ठेवला होता. मी तीच्या कडे पाहून हसलो. म्हणालो “खूप मस्त बनवलंयस”. ती गोड हसली.

पुढच्या आठवड्यात आम्ही भेटलो तेंव्हा तिच्या शाळेतल्या शिक्षिकाही बरोबर होत्या. मी म्हटलं “माझा अंदाज बरोबर निघाला. स्वराला अध्ययन अक्षमता (LEARNING DISABILITY) आहे. आपण हे वास्तव स्वीकारायला हवं. आणि त्यातूनही तीच्या साठी सुंदर आयुष्य कसं निर्माण करता येईल हे पाहायला हवं. तीच्यातल्याच चांगल्या क्षमतांचा विकास घडवून एक चांगलं भविष्य निर्माण करायचा प्रयत्न करायला हवा.” अस्मिताच्या डोळ्यात थोडी भीती आणि अविश्वास होता. आणि ते नैसर्गिक होतं. शेवटी आईचं काळीज होतं . शिक्षिका म्हणाल्या “सर, थोडक्यात अध्ययन अक्षमते (learning disability) विषयी सांगाल का? शाळा म्हणून आम्ही काय मदत करू शकतो? मुळात प्रॉब्लेम असू शकेल हे ओळखायचं कसं ?  मी म्हणालो “प्रथम लक्ष ठेवायचं की आपल्या पाल्याला शाळेत शिकताना किंवा घरी अभ्यास करताना काही प्रॉब्लेम्स येतायत का? म्हणजे वाचणे, लिहिणे किंवा गणिते सोडवणे इत्यादी.? आणि मुख्य म्हणजे हे सतत घडतंय का? तसं सतत घडत असेल तर त्याला एखादी  learning disorder  (अध्ययन अक्षमता ) असू शकेल. त्यासाठी वेळेवर मदत घायला हवी. LD हा काही बुद्धिमत्तेचा प्रश्न नव्हे तसेच ह्या मुलांना आळशी किंवा मठ्ह समजता कामा नये. तर त्यांच्या मेंदूमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने माहितीचे संकलन किंवा processing होते. तसेच मेंदू वेगळ्या पद्धतीने react होतो. वास्तविक ही मुलं इतर मुलांप्रमाणेच चाणाक्ष किंवा तल्लख असू शकतात. पहाणे, ऐकणे आणि समजणे वेगळे असते. त्यामुळेच नवीन गोष्टी शिकताना, कौशल्ये आत्मसात करताना आणि ती वापरताना  ह्यांना खूप कठीण जातं. Learning disorder प्रत्येक मुलाच्या बाबतीत वेगवेगळी असते. एखाद्या मुलाला वाचणे किंवा spelling मध्ये प्रॉब्लेम्स असतात तर एखादा ह्या गोष्टी करू शकतो पण गणित अजिबात जमत नाही, समजतच नाही. एखाद्याला समोरचा काय म्हणतोय किंवा काय शिकवतोय हेच कळत नाही. म्हणजेच प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असू शकतात. ह्या सगळ्या learning disabilities च आहेत. सुरवातीला शब्दोचार करताना अडचण येते . शब्द व त्याचा ध्वनी ह्यातील नातं लक्षात येत नाही त्यामुळे शब्दोच्चार करण्यात तसेच शब्द  समजण्यात अडचणी येतात.योग्य शब्द निवडताना अडचण येते. कविता म्हणताना अडचण येते. अक्षरं , संख्या,रंग, आकार, आठवड्याचे दिवस लक्षात ठेवण्यात अडचण येते.

बऱ्याच वेळा गतिमंदत्व (autism) किंवा ADHD (Hyper activity) असल्यास, त्यामुळे किंवा त्यासोबत अध्ययन अक्षमता असू शकते.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्या सगळ्यावर उपाय आहेत का? ह्याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या disorder च्या तीव्रतेवर, योग्य औषधं, स्पेशल थेरपीज मिळतात की  नाही ? कुटुंबाचा आणि शाळेचा दृष्टीकोन सकारात्मक आहे की नाही,  त्यांनी ह्या मुलांशी वागायची विशेष कौशल्ये शिकून घेतली आहेत की नाहीत,  ह्यावर अवलंबून आहे. ही मुलं म्हणजे लोढणं न समजता त्यांची बलस्थानं ओळखून त्यांना प्रोत्साहित करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट. तसंच पेशन्स ठेवून हे प्रयत्न होणं फार गरजेचं आहे.

आता आपल्या स्वराच्या बाबतीत पाहिलं तर तीची कल्पनाशक्ती, मॉडेल्स बनवण्याची अफलातून क्षमता ह्याला प्रोत्साहन द्यायला हवं. जोडीला बाकीची कौशल्ये शिकवणे ज्यायोगे तीला दैनदिन जीवनात उपयोग होईल. तीला अजिबात कमी न लेखणे, इतर मुलांशी तुलना न करता तिचा आत्मविश्वास कसा वाढेल हे पहाणे महत्वाचे. स्वरासारखीच काही मुलांना इतर कला विशेषत: संगीत व खेळ ह्यात गती असू शकते.”

मी बोलायचा थांबलो तेंव्हा अस्मिता आणि स्वराच्या शिक्षिका ह्यांच्या चेहेऱ्यावर स्वस्थता आली होती. आणि निर्धार सुद्धा. आम्ही सगळ्यांनी टीम म्हणून काम करायचं ठरवलं.
ह्या घटनेला आज दोन वर्ष होऊन गेली आहेत  . स्वरात खूपच प्रगती आहे. प्रवास अवघड निश्चित आहे पण एक एक टप्पा पार करत ती पुढे जातेय . ह्यात तिचे पालक आणि शाळा दोघांचाही वाटा आहे.  आकाश हळू हळू स्वच्छ, निरभ्र, नितळ  होत चाललंय.. निरागस, स्वरा मधलं सृजन दिवसेंदिवस फुलत चाललंय.

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

 

सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या अक्षमता -

Dyslexia डिसलेक्षिआ – वाचन, लिहिणे,बोलणे,स्पेलिंग ह्यामध्ये प्रॉब्लेम्स

Dyscalculia - डिस्क्याल्क्युलीया – गणिते सोडवणे, वेळ कळणे, आर्थिक व्यवहार करणे ह्यात प्रोब्लेम्स

Dyspraxia डिसप्रयाक्शिया – हात व डोळे ह्यांच्या वापरात सुसूत्रता नसणे, स्वतःचा तोल सांभाळता न येणे, हातांचा कौशल्याने व सुसूत्रतेने वापर न करता येणे.

Dysphasia – डिस्फ्याशिया- भाषा शिकताना, बोलताना अडचणी.

Auditory Processing Disorderऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर -भिन्न आवाजातील फरक न कळणे. त्यामुळे शिकताना, ऐकताना, मोठ्याने वाचताना अडचणी येणे.

Visual Processing Disorder- व्हिजुअल प्रोसेसिंग डिसऑर्डर – दृश्य माहितीचा अर्थ न लावता येणे. त्यामुळे नकाशे, चार्टस, आकृत्या, फळ्यावरील गोष्टी वाचणे ह्यामध्ये प्रॉब्लेम्स.