Monthly Archives: April 2013

सुखी संसाराचे manual

सुखी संसाराचे manual 

                                                                           डॉ विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ 

आशुतोष आणि सायलीच्या लग्नाचं reception चालू होतं. वातावरण खूप आनंदाचं, उत्साहाचं होतं. मित्रमैत्रिणींची चेष्टा मस्करी चालू होती. Wish you a Happy and Prosperous married life सारख्या शुभेच्छा स्टेजवरून ऐकू येत होत्या. मी समोरच बसलो होतो. दोघंही शुभेछ्यांचा स्वीकार करत होते. “Happy married life” .. . “Happy married life” .. माझ्या चेहेऱ्यावर स्मित उमटलं. चार महिन्या पूर्वीचं दृष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. दोघंही माझ्याकडे आले होते. ओळख झाली. दोघंही आय.टी. मध्ये इंजिनियर होते. छान नोकरी होती. ” सर, आम्ही लग्न करतोय. तसा प्रेमविवाहच. तसे  काही issues नाहीत. पण पुढे काही problems येऊ नयेत म्हणून मार्गदर्शन हवंय. सुखी वैवाहिक जीवनासाठी काही टिप्स हव्यात.” मी हसलो. म्हणालो ” मी आधी तुमचं अभिनंदन करतो. अशासाठी की आपण एकमेकांना खरोखरच अनुरूप आहोत का ह्यासाठी तुम्ही लग्नापूर्वीच मार्गदर्शन घेताय. त्यामुळे पुढे उदभवू शकणाऱ्या अनेक प्रश्नांची कारणं आणि उत्तरं समजू शकतील. कसं आहे की आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याच्याबरोबर ती कशी चालते , कुठल्या काळज्या घ्याव्यात हे सगळं सांगणारी एक पुस्तिका(manual ) येते. नातं जोडताना ते कसं टिकेल, कसं बहरेल, त्यासाठी काय करावं हे सांगणारी कुठलीही पुस्तिका नसते. जोडीदाराला समजून घेत घेतंच संसार सुखी होऊ शकतो. पण त्यासाठी काही निश्चित अशा टीप्स आहेत. तुम्हाला त्या सांगतो.

आपला जोडीदार सर्वार्थाने परिपूर्ण असलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे तो अट्टाहास नसावा. तसा कुणीच सर्वगुणसंपन्न असू शकत नाही.प्रत्येकाची भावनिक वीण, मनाची धाटणी वेगवेगळी असते. ती ओळखणं, मान्य करणं  आणि त्यानुसार सुरवातीला जमवून घेण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं. नंतर सूर जसे जमत जातील तशी समोरची व्यक्ती आणि आपणसुद्धा बदलत जातो. समोरची व्यक्ती एकदम बदलू शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा ह्याची जाणीव ठेवावी.

सुखी लग्नामध्ये जोडीदाराकडून आपण किती सुख घेतोय ह्यापेक्षा त्याला किती सुख देतोय हा विचार सर्वात महत्वाचा. हे सगळं साधण्यासाठी आपण आतून स्वस्थ असणं महत्वाचं. ते तसं नसेल तर त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणं, जरूर भासल्यास मदत घेणं फार महत्वाचं आहे. अन्यथा जोडीदाराला समजून घेणं ही गोष्ट अशक्य होऊन बसते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्वाच्या गोष्टी म्हणजे शारीरिक सुख देण्या-घेण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता, जोडीदाराला योग्य तो आदर आणि सन्मान देणं, त्याच्या भावनांची कदर करणं, योग्य आर्थिक नियोजन, काळानुसार पुरुष श्रेष्ठत्वाच्या कल्पना बदलणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर, त्याला किंवा तीला व्यावसायिक मित्र किंवा मैत्रिणी असणारच हे मान्य करणं(विशिष्ठ मर्यादेपर्यंत मैत्री), एकमेकांना वेळ देणं, जोडीदाराचा उत्कर्ष होण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, ह्याबाबतीत अहंकार आडवा न येऊ देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोडीदारावर पूर्ण विश्वास असणं.

इगो किंवा अहंकार हा वैवाहिक जीवन उध्वस्त करू शकतोकिंबहुना घटस्फोटा सारख्या सध्याच्या गंभीर समस्ये मागे हेच प्रमुख कारण आहे.

आयुष्यातल्या किंवा संसारातल्या महत्वाच्या निर्णयामध्ये दोघांनीही सहभागी होणं महत्वाचं ,त्याचबरोबर प्रत्येकवेळी माझाच निर्णय बरोबर तो मी लादणार हे चुकीचं आहे. दोघांमध्ये शांतपणे चर्चा व्हाव्यात. दुसऱ्याची बाजू ऐकून घायची तयारी हवी. मत मांडण्याची पद्धत खूप महत्वाची आहे. आक्रस्ताळेपणा, चढलेला आवाज संवाद घडू देत नाही.फक्त कटुता निर्माण होते.

सध्याच्या काळात दोघंही पतिपत्नी कमवत असतात. जर पत्नीचा पगार जास्त असेल तर तो भांडणाचा मुद्दा बनू नये. कारण ह्यामागे केवळ अहंकार दुखावला जाणे हेच कारण असते. अर्थात पत्नीचीही वागण्याची पद्धत समजूतदारपणाची हवी. दोघात निर्माण झालेले प्रेम असे मुद्दे निर्माणच होऊ देत नाहीत.

सध्याच्या काळात ऑफिसमधील कामाचे प्रेशर वाढलेले असते. टार्गेट्स पूर्ण करायची असतात. तसेच इतर वहातुकीसारखे प्रश्न असतात. घरी आल्यावर थकून जायला होतं. अशावेळी स्वस्थता हवी असते, हे दोघांनीही  समजून घ्यायला हवे.

हे सगळं समजून घेतल्यावर भांडणं होणारच नाहीत असं नाही पण पुरेसं प्रेम, विश्वास ह्याचा पाया असेल तर समेट लवकर होईल. नात्यात कायमची कटुता निर्माण होणार नाही.

आता महत्वाचे म्हणजे दोघांची शारीरिक तपासणी आणि दोन्ही व्यक्तिमत्व एकमेकांना अनुरूप आहेत की  नाहीत हा मुद्दा ? लग्नापूर्वी दोघांनीही रक्त व इतर शारीरिक तपासणी करून घेणे व कुठलाही निष्कर्ष एकमेकांपासून न लपवणे अतिशय महत्वाचे आहे. लग्नापूर्वी अनेकदा भेटणे व जोडीदाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे. आपल्या कल्पना व अपेक्षा मोकळेपणाने सांगणे अत्यावश्यक. लग्नापूर्वी सर्वच बाबतीत तज्ञांशी बोलणे महत्वाचे आहे. काही व्यक्तिमत्वे एकमेकांना पूरक नसू शकतात. काय काळज्या घ्याव्यात किंवा कुठल्या सुधारणा करणे शक्य आहे  हे तज्ञच सांगू शकतात.

लग्न करताना बाह्य व्यक्तिमत्वापेक्षाही, ती व्यक्ती समजूतदार, आनंदी  आणि शारीरिक ,मानसिक व सामाजिक दृष्टीने जबाबदार आहे की नाही हे महत्वाचे. तीच्या “दिसण्या” पेक्षा “असणे” महत्वाचे ठरते.

सायली व आशुतोष लक्ष देऊन ऐकत होते. पुढच्या काही दिवसात त्यांनी सर्व चाचण्या करून घेतल्या. आमची सेशन्स झाली.त्यांच्यातही ह्या विषयाला धरून छान गप्पा झाल्या असणार. थोड्याच दिवसात लग्नाचे निमंत्रण आणि चेहेऱ्यावर खूप सारा आनंद घेऊन दोघं आले. मलाही खूप छान वाटत होतं.

 

पौगंडावस्थेतील अस्वस्थता /नैराश्य

पौगंडावस्थेतील अस्वस्थता /नैराश्य

                                                              डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

दहावीचे पेपर्स चांगले गेले होते. हस-या चेहे-याने अजय समोर उभा होता. मला बरोबर एक वर्षापूर्वीची आठवण आली.

त्या दिवशी अजय क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये हताश होऊन बाहेर बसला होता. आणि आत एक महत्वाची मिटिंग होती. मी, अजयचे आई वडील आणि अजयच्या वर्गशिक्षिका हळबे बाई.  वातावरण तसं तणावपूर्ण होतं. कारणच तसं थोडं गंभीर होतं. गेल्या वर्षी पर्यंत पहिल्या पाचात येणारा अजय परीक्षेत चक्क दोन विषयात नापास झाला होता. आता येणारं वर्ष दहावीचं. महत्वाचं. आई खूप अस्वस्थ झालेली, संतापलेली. कुठल्याही क्षणी रडू फुटेल अशा अवस्थेत.  ” सर, काय कमी केलं आम्ही ह्याच्यासाठी? तो म्हणेल तो क्लास, पुस्तकं, कम्प्युटर, मोबाईल. सगळं दिलं, पण गेले काही महिने अभ्यासाचं नाव नाही. जरा कुठे बसला की उठलाच दहा मिनटात. लक्ष लागत नाही म्हणे. विचार येतात म्हणे मनात. सारखा टि.व्ही बघायचा, मोबाईल  वर नाहीतर इंटरनेटवर रात्री उशिरापर्यंत गेम खेळायचे. त्यावेळी नाही येत ते विचार? वेळेवर झोपणं नाही, उठणं नाही, सारखा निराश, सारखी चिडचिड करायची. नीट बोलायचं नाही कुणाशी.” मी आईला  बोलू दिलं, मोकळं होऊ दिलं. म्हंटलं

“आई तुम्ही आधी शांत व्हा. ह्या गोष्टीचा धक्का बसणं अगदी स्वाभाविक आहे. आपण सर्व बाजूनं विचार करुया. नेमकं काय घडलय हे समजावून घेऊ या. आणि मार्ग काढूया. अजय हुशार मुलगा आहे. सिन्सियर आहे. मी त्याच्याशी बोललोय. काय घडलंय ह्याचा अंदाज आलाय. मार्क्स कमी पडल्याचं त्यालाही खूप वाईट वाटतंय. पण तो हतबल आहे. हे का घडलं आणि त्याच्यावर उपाय काय हे मी सांगणारच आहे. तो म्हणतोय ते खरं आहे, त्याचं खरोखरच अभ्यासात लक्ष नाही लागत आहे. एकाग्रता नाही होत आहे. तो हे मुद्दाम करत नाहीय. पौगंडावस्थेतील नैराश्याच्या आजाराची ही सुरवात असू शकते. काही चाचण्या नंतर ते निश्चित  होईल.    हळबे बाई लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्यांनी विचारलं “सर, मोकळेपणाने विचारू? अजय सारखा प्रॉब्लेम हल्ली खूप मुला मुलींमध्ये दिसतो. आम्हालाही आश्चर्य वाटतं. मुलांच्या बाबतीत हे का घडतय ? ह्या आजाराची लक्षणं काय आहेत आणि उपाय काय आहे?  मी म्हंटल “बाई प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही शिक्षकांनी ह्यात रुची दाखवणं आता खूप महत्वाचं आहे. शेवटी पालक, शिक्षक आणि तज्ञ ह्या सगळ्यांच टीमवर्क असणं आवश्यक आहे. ह्या आजारात साधारण लक्षणे कुठली दिसतात? तर -

अभ्यासातली एकाग्रता कमी होणे तसेच energy level कमी होणे, शाळेत अनुपस्थिती, मार्कांमध्ये घसरण. एकूणच पूर्वीच्या हुशार असणा- मुलाची गुणवत्ता घसरणे.

अस्वस्थपणा व चिडचिड करणे, अपराधीपणाची भावना तसेच आपण निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव तसेच passion नसणे, एकाग्रतेचा अभाव, अति हळवे होणे तसेच लहान  सहान  गोष्टी वरून अश्रुपात/रडणे, विलक्षण कंटाळा, लहान सहानगोष्टीवरून आक्रमक होणे, जेवण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, घरापासून लांब लांब रहाण्याची प्रवृत्ती, अति T .V. बघणे   / computer  games  खेळणे, टीका अजिबात सहन न होणे व सतत दुखावले जाणे, एकटे एकटे रहाणे तसेच सार्वजनिक/कौटुंबिक समारंभ टाळणे, शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी. स्व:ताला  इजा करून घेण्याचा  किंवा आत्महत्येचे विचार.

मुला-मुलीं मध्ये ही लक्षणे किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पहायला हवे. त्याच बरोबर पौगंडावस्था हा एक  सर्वार्थाने स्थित्यंतराचा कालावधी असतो त्यामुळे काहीवेळा ही लक्षणे नॉर्मल असू शकतात. ज्याला “growing  pains ” म्हणतात. पण ती तशी आहेत की आजाराचा भाग आहेत हे  तज्ञच ठरवू शकतात. ब-याचदा अति उत्साही वागण किंवा दुराग्रही  बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणे असू शकतात. बर, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुखी: दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे आजाराच्या अवस्थेकडे  दुर्लक्ष होऊ शकते.

अस्वस्थता - नैराश्याच्या आजाराचे मुख्य कारण  म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल / असंतुलन होय.

आजारास सहाय्यभूत ठरणारे महत्वाचे घटक कुठले? तर –अनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश,  आई वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचे वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का ह्या सर्वातून निर्माण होणारा ताण, जरा मोठ्या मुलांच्या बाबतीत एकतर्फी प्रेमातले अपयश, आयुष्यातील यशा बद्दलच्या चुकीच्या कल्पना, तसेच झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही भ्रष्टाचारामुळे हव्या त्या अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्व, स्व-प्रतिमा क्षीण असणे व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी,  लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात, इतर गंभीर मानसिक आजारांबरोबरसुद्धा नैराश्याचा आजार असू शकतो.

पौगंडावस्थेतील नैराश्य्य दुर्लक्ष्य करण्या सारख नक्कीच नाही. त्यामुळे सगळं आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न रहाणे चांगले. ताबडतोब तज्ञांचे मार्गदर्शन घेणे चांगले.
सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्या विषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा.

आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ञाची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले  बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे हे तज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळे असले तरी पाल्याच्या भविष्य्याच्या दृष्टीने ते दुरुस्त व्हायला हवेत.

आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचार पद्धती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार ह्यांच्या आधारे ह्यातून निश्चित बाहेर पडता येतं.
वर्षापूर्वी अस्वस्थतेच्या गर्तेत सापडलेला अजय, काही काळात त्यातून बाहेर आला. त्याचं अभ्यासात पूर्ववत लक्ष लागायला लागलं इतकच नव्हे तर तो भावनांवर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी, इतर स्किल्स शिकला.

आज दहावीचे पेपर्स चांगले गेले होते. मी त्याचं अभिनंदन केलं. त्यानंही शिकलेली स्किल्स वापरत रहाण्याचं प्रॉमिस दिलं. एक आयुष्यं मार्गी लागलं.

अस्वस्थतेच्या, नैराश्याच्या आजारामुळे, फुलणा-या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.