Monthly Archives: May 2013

Manual for Happy Family

समृध्द, सुखी कुटुंब
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात ,फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक उर्जा भरून राहिली आहे असं वाटतं . भले मग ते घर सांपत्तिक दृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो. आपल्यालाही त्यांच्या वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून एक प्रकारचा मोकळेपणा आणि सकारात्मक संवेदना जाणवतात. आपल्यालाही तेथे वारंवार जावसं वाटतं तसेच आपलंही घर, आपलंही कुटुंब तसं असावं, असं वाटतं. असं कुटुंब “समृध्द ” असतं .
ह्या समृद्धीचे सहा सोपान असतात. प्रत्येक व्यक्तीची सकारात्मक मानसिकता, प्रत्येकाचं उत्तम आरोग्य, एकमेकांमधील विश्वासावर, आदरावर, प्रेमावर आधारित नातेसंबंध, दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, सुख किंवा दुख: वाटून घेण्याची वृत्ती आणि अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत समाधानी रहाण्याची, एकोप्याने राहण्याची वृत्ती.
आता हे सगळं जमवून आणायचं असेल तर कुटुंबातील प्रत्येकासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येकाला काही नियम समजून घ्यायला लागतील आणि आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. आपण तीन पिढयांचे कुटुंब गृहीत धरुया. उदा. घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणजे आजी आजोबा , मधली पिढी म्हणजे नवरा बायको व तरुण पिढी म्हणजे मुले.
सर्वांसाठी टिप्स -१. कुटुंब संस्थेवर विश्वास ठेवा. म्हणजेच इतरांबरोबर आनंदाने, स्नेह्बंधनाने आपण रहातो तेंव्हा सर्वांचंच व्यक्तिमत्व फुलू शकतं ह्यावर विश्वास ठेवा. . विपरीत परिस्थितून वर आलेल्या व्यक्ती, संपूर्ण कुटुंब आपण पहातो. त्यामागे व्यक्तीच्या कर्तृत्वा बरोबरच कुटुंबातील प्रेम , एकमेकांसाठी केलेला त्याग, धैयाने परिस्थितीशी दिलेली झुंज हे सगळं असतं.

२ . कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, भावनिक वीण ही वेगळी असू शकते. भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. भावनिक सहनशीलतेची पातळी वेगळी असू शकते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे लहान सहान कारणांवरून खटके उडणार नाहीत. मतभेद झाले तरी लवकर मिटतील. स्वस्थ कुटुंबासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे.

३.स्वत: भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या शांत, स्वस्थ आहोत का हे तपासा. कारण जेंव्हा व्यक्ती आतून स्वस्थ, शांत असते तेंव्हा आणि तेंव्हाच ती स्वत:ला आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. तसं नसेल तर त्यासाठी उपाय करा. एकमेकांशी किंवा विश्वासातल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या. स्वस्थतेसाठीचे व्यायाम करा. उदा. ध्यान, योगासने इत्यादी.

४. अहंकार आड येऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मतं असू शकतात हे मान्य करा. कुठल्याही प्रश्नावर टोकाची भूमिका टाळा. तुटेपर्यंत ताणू नका. सर्व कुटुंबासंदर्भातले काही निर्णय एकत्र चर्चा करून घ्या. ह्या प्रक्रियेमध्ये सर्वांची मते विचारात घ्या. एकमेकांशी बोलताना, वागताना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मला समोरच्याला आनंद द्यायचाय ही भावना महत्वाची.
५. जेष्ठ पिढीने तरुण पिढीला शक्यतो आवश्यक ते स्वातंत्र्य द्यावे. आमच्या वेळेला असं होतं असा धोशा लावू नये. काळ बदलत रहातो. आपल्यालाही बदलायलाच हवे हे लक्षात घ्यावे. त्याच बरोबर नवीन पिढीनेही जेष्ठांच्या सगळ्याच गोष्टी, विचार टाकावू आहेत असा विचार करू नये. त्यांना योग्य तो आदर द्यायला हवा. त्यांच्या सूचनांवर विचार करावा.
६. कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा संवाद असावा. त्यासाठी दिवसातील किंवा शक्य नसेल तर आठवड्यातील काही काळ , काही तास सर्वांनी एकत्र येउन कौटुंबिक किंवा साहित्य, संगीत इत्यादी विषयांवर गप्पा माराव्यात. इतरांचं ऐकून घेण्याची क्षमता, मदत मागण्याचा मोकळेपणा, आपण कुटुंबातील महत्वपूर्ण सदस्य आहोत ह्या धारणा स्वास्थ्यपूर्ण आहेत.
७. काळ बदलतो आहे. Technology चा वापर दैनंदिन आयुष्यात अपरिहार्य आहे. घरातील तरुण पिढी तो करणारच. त्यांना त्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायलाच हवं. पण त्याचा दुरुपयोग किंवा त्यातच वेळ काढत रहाणं ही भावनिक समस्या किंवा अस्वस्थतेला वाट मिळवून देणं असू शकतं. उदाहरणार्थ अती आणि अवेळी मोबाईल चा वापर, अति गेम्स इ. अशावेळी प्रेमाने समजावून सांगणं व त्यात यश येत नसेल तर तज्ञांची मदत घेणं अपरिहार्य आहे. सतत ओरडणं, दमदाटी करणं, आत्मसन्मान दुखावेल असे शब्द उच्चारणं ह्यातून फक्त वातावरण तणावपूर्ण राहिल. तरुण पिढीचीही जबाबदारी आहे की जेष्ठ जे सांगत आहेत त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी. जेष्ठांचा अनुभव व आपल्या बद्दल वाटणारा जिव्हाळा त्यामागे असू शकतो.
८. लग्न जमवणं हा एक महत्वाचा मतभेदाचा मुद्दा असतो. ह्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फक्त निवडीसाठीचे निकष काय असावेत ह्याबाबतीत मोकळेपणाने संवाद व्हावा उदा. निर्व्यसनीपणा, चारित्र्य, इत्यादी. परंतु कुठलंही दडपण आणू नये.
९ . सध्याच्या काळात मित्र मैत्रिणी असणं हे समाजव्यवस्थेचा भागच बनला आहे. त्याबाबतीत मुलां मुलींना टोकू नये. फक्त मर्यादांची व धोक्यांची जाणीव करून द्यावी. मुलामुलीनीही ही बाब समजून जबाबदारीने मैत्र जपावे. चांगला मित्र किंवा मैत्रीण हे बलस्थानही असू शकतं.
१०. सासू सून नातं हे नाजूक प्रकरण असू शकतं . पण ह्याही बाबतीत सासुबाईनी सुनेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आता काळ बदलला आहे. मुली सुशिक्षित असतात, त्यांची संसाराबाबत स्वतंत्र मतं असू शकतात हे लक्षात घ्यावं. त्याच बरोबर आपण निरुपयोगी झालो, आपला काळ संपला असं वाटून हताशही होऊ नये. सुनेनेही सासुला आवश्यक तो आदर द्यावा, सल्ला घ्यावा.
सासुसुनेच्या नात्यातील तणावांमुळे मुलावर विलक्षण ताण येऊ शकतो, हे दोघींनीही लक्षात घ्यावे. कारण तो एकाच वेळी मुलगाही असतो आणि पतीही.

११. घरात लहान मुलांसमोर कुणीच कुठलेही वादविवाद करू नयेत. अपशब्द उच्चारू नयेत. लहान मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ, कणखर होणं ही काळाची गरज आहे.

जुनी पिढी आणि नवीन पिढी ह्यांच्या दृष्टीकोनांमध्ये फरक असणारच पण सुवर्णमध्य काढता येणं ही कला आहे. एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना , आदर, प्रेम निर्माण झालं, “मी पणा ” सोडता आला की ते सहज शक्य आहे.
आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठीच आपला जगण्याचा प्रवास आहे. कुटुंबाचं प्रेम हे त्या प्रवासासाठी एक बलस्थान आहे.

डॉ. विद्याधर बापट
www.vidyadharbapat.in