Monthly Archives: June 2013

Teenage Anxiety

पौगंडावस्थेतील अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ञ
www.vidyadharbapat.in
पौगंडावस्थेतील अस्वस्थतेचा आजार आणि नैराश्याचा आजार, ही बाब आजकाल गंभीर स्वरूप धारण करत चाललेली आहे. हे आजार जितक्या लवकर लक्षात येतील तेवढ्या परिणामकारक रित्या ह्या आजारावर उपचार होऊ
शकतात. ह्यासाठी आजाराची लक्षणे समजून घेणे व वेळेवर तज्ञांची मदत घेणे ही पालक आणि शिक्षक ह्या दोघांचीही जबाबदारी आहे.
पौगंडावस्थेत व्यक्तिमत्व उमलत असत. त्याला अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहात असतो. पण तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडत असतात, मनात घोंघावत असतात उदा. मी कोण आहे ? इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का ? , ह्या सगळ्या जगरहाटीत माझ काय स्थान आहे? प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचं domination का ? स्त्री पुरुष संबध म्हणजे काय व इतर लैंगिक प्रश्न.
अशा परीस्थितीत नुसताच मूड upset आहे की अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे ह्यातील फरक ओळखणे हे फक्त तज्ञ व्यक्तीच करू शकते.
बर, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुखी: दिसतीलच असंही नसत. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. ब-याच जणांमध्ये आक्रमकता, चीडचीडेपणा ही दिसू शकतो.
अभ्यासातली एकाग्रता कमी होणे तसेच energy level कमी होणे, शाळेत अनुपस्थिती, मार्कांमध्ये घसरण. एकूणच पूर्वीच्या हुशार असणा- मुलाची गुणवत्ता घसरणे.
अस्वस्थपणा व चिडचिड करणे, अपराधीपणाची भावना तसेच आपण निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव तसेच passion नसणे, एकाग्रतेचा अभाव, अति हळवे होणे तसेच लहान सहान गोष्टी वरून अश्रुपात/रडणे, विलक्षण कंटाळा, लहान सहानगोष्टीवरून आक्रमक होणे, जेवण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, घरापासून लांब लांब रहाण्याची प्रवृत्ती, अति T .V. बघणे / computer games खेळणे, टीका अजिबात सहन न होणे व सतत दुखावले जाणे, एकटे एकटे रहाणे तसेच सार्वजनिक/कौटुंबिक समारंभ टाळणे, शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी. स्व:ताला इजा करून घेण्याचा किंवा आत्महत्येचे विचार.
मुला-मुलीं मध्ये ही लक्षणे किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पहायला हवे. त्याच बरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थाने स्थित्यंतराचा कालावधी असतो त्यामुळे काहीवेळा ही लक्षणे नॉर्मल असू शकतात. ज्याला “growing pains ” म्हणतात. पण ती तशी आहेत की आजाराचा भाग आहेत हे तज्ञच ठरवू शकतात. ब-याचदा अति उत्साही वागण किंवा दुराग्रही बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणे असू शकतात. बर, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुखी: दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते.
अस्वस्थता – नैराश्याच्या आजाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल / असंतुलन होय.
आजारास सहाय्यभूत ठरणारे महत्वाचे घटक कुठले? तर –अनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचे वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का ह्या सर्वातून निर्माण होणारा ताण, जरा मोठ्या मुलांच्या बाबतीत एकतर्फी प्रेमातले अपयश, आयुष्यातील यशा बद्दलच्या चुकीच्या कल्पना, तसेच झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही भ्रष्टाचारामुळे हव्या त्या अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्व, स्व-प्रतिमा क्षीण असणे व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात, इतर गंभीर मानसिक आजारांबरोबरसुद्धा नैराश्याचा आजार असू शकतो.
पौगंडावस्थेतील नैराश्य्य दुर्लक्ष्य करण्या सारख नक्कीच नाही. त्यामुळे सगळं आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न रहाणे चांगले. ताबडतोब तज्ञांचे मार्गदर्शन घेणे चांगले.
सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्या विषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा.
आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ञाची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे हे तज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळे असले तरी पाल्याच्या भविष्य्याच्या दृष्टीने ते दुरुस्त व्हायला हवेत.
आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचार पद्धती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार ह्यांच्या आधारे ह्यातून अस्वस्थतेच्या, नैराश्याच्या आजारामुळे, फुलणा-या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.