परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्वाचं असं नवीन वर्षं काही दिवसात सुरु होइल. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता कशी साधावी हा मोठा प्रश्न असतो. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येत नाही. त्याचा आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. आपण मागे पडू अशी भीती वाटू लागते.
एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे.
अभ्यास करताना ज्ञानेन्द्रीयान्द्वारे माहिती स्वीकारली जाणे.ती मेंदूत साठवली जाणे. आणि आवश्यक तेंव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे. ह्या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात coordination असणे, फार महत्वाचे आहे.
अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: – ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे.
मुळात मन स्वस्थ , स्थिर नसेल तर एकाग्रता साधणं शक्य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहित आहेत, त्यांची एक लिस्ट करावी. विश्वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ञ ह्यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ञांचे सहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder ) किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठी देखील वेळ न दवडता तज्ञांचे उपचार घ्यावेत.
अभ्यासाला बसताना अभ्यास चांगला होईलच हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सुरवात करावी.
अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे. रोजच्या अभ्यास नियोजनात साधारण ५० मिनिटे झाल्यावर पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर काही क्षण श्वासावर लक्ष ठेऊन शांत बसावे. त्यानंतर पुढचा अभ्यास करावा. अभ्यास करताना मनात इतर विचार आल्यास स्वत:ला स्टोंप इट, रिल्याक्स, बी हियर नाऊ इत्यादी स्वयं सूचना द्याव्यात. मन वर्तमान क्षणात ठेवण्यास त्याचा उपयोग होईल.
रोजच्या अभ्यासाची आखणी करताना साध्य होऊ शकेल इतपतच अभ्यासाची योजना आखावी व तो पूर्ण करावा. अभ्यास करताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल परंतु S3RQ अशी पद्धत वापरून पहावी. म्हणजे जो अभ्यास आत्ता करायचा आहे प्रथम त्याचं सर्व साधारण अवलोकन(Survey), काळजीपूर्वक वाचन(Read), त्यातील महत्वाचा भाग लक्षात ठेवत उजळणी (Revise), त्यानंतर महत्वाचे म्हणजे जो अभ्यास केलाय तो समोर एक काल्पनिक व्यक्ती आहे असे मनात आणून तीला समजेल अशा पद्धतीने, पुस्तकात न बघता, मोठ्याने बोलून शिकवणे(Recite). ही गोष्ट महत्वाची का तर , आपला खरंच अभ्यास झालाय की नाही, आपल्याला समजलंय की नाही ह्याची चाचणी होते. ह्या शिकवण्यात अडलं तर मधूनच पुस्तक/नोट्स refer करायला हरकत नाही. पण आत्मविश्वास येईपर्यंत पुन्हा पुन्हा शिकवावे. ह्याने चांगल्या रीतीने लक्षात राहायला मदत होते. त्यानंतर काही कालांतराने स्वत: प्रश्न काढून उत्तरे लिहिण्याचा सराव करावा.
कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास रोज काहीवेळ करावाच. काही विषय आवडत नसतील तर त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा. माझ्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास आवश्यक आहे हे मनाला बजावावे.
एकाग्रता कमी होतेय असं वाटलं की पुढचा अभ्यास करणं काहीवेळ थांबवून, झालेला अभ्यास पुन्हा आठवावा. काही दीर्घ श्वास घेवून सावकाश सोडावे. स्वत:च्या श्वासाकडे , शरीराकडे, वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रीयांना जाणवणाऱ्या संवेदनांकडे क्रमाक्रमाने त्रयस्थपणे पहावे. काहीवेळ स्वत:चा श्वास पहावा. मन अशा पद्धतीने divert व relax करावे. वाटल्यास थोड्या वेळ शारीरिक हालचाली कराव्यात, खोलीतल्या खोलीत चालावे. पुन्हा पुढच्या अभ्यासाला सुरवात करावी.
पूर्वी आपला ज्यावेळी खूप छान एकाग्रतेने अभ्यास झाला होता त्यावेळची मन:स्थिती वारंवार आठवावी व त्या धारणेने अभ्यासाला बसावे.
रोज चल पद्धतीचा व्यायाम (धावणे,वेगात चालणे, पोहोणे इ.) करणे आवश्यक आहे. ज्यायोगे मेंदूतील पेशींना मुबलक प्राणवायू मिळेल. चांगली संप्रेरके स्त्रवतील . ज्याचा एकाग्रतेवर चांगला परिणाम होईल.
चौरस, पौष्टिक आहार वेळेवर घ्यावा. भरपूर फळे, भाज्या, ओमेगा ३ युक्त, व्हिटामिन बी,सी,ए, इ,लोह युक्त पदार्थ.
रोज ओमकार करणे, थोड्यावेळ शांत संगीत ऐकणे ह्याचाही एकाग्रतेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
अभ्यास करण्याची जागा शक्यतो एकच असावी. तिथे शक्यतो मोबाईल, टी.व्ही. इत्यादींचा अडथळा नसावा. बसूनच अभ्यास करावा (पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने). पलंगावर लोळत अभ्यास करू नये. पलंग ही फक्त झोपण्याची,आराम करण्याची जागा आहे.
ठरवलेला अभ्यास पूर्ण झाला तर आणि तरच स्वत:ला थोडा वेळ टी.व्ही.इ. मनोरंजनासाठी परवानगी द्यावी.
परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नसून, मेंदूसाठी, आपल्यासाठी, ठराविक वेळेत अभ्यास करून स्वत:ला सिद्ध करण्याची, ती एक संधी आहे हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यामध्ये नवीन दृष्टीकोन तयार होण्याची, विश्लेषणाची, समजून घेउ शकण्याची, लक्षात ठेवण्याची आणि चांगल्या रीतीने सादरीकरणाची, ह्या क्षमता निर्माण होण्याची ती एक संधी आहे.