Monthly Archives: August 2013

व्हिडीओ गेम्सचं व्यसन आणि मुलं – Published in Sunday Sakal

व्हिडीओ गेम्सचं व्यसन आणि मुलं
– डॉ विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणूकाही जीवन मरणाचा प्रश्न होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतीदायक गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद ,कधी विलक्षण हताश. त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितकं लांब पळता येईल तेवढं पळायचं होतं.

व्हिडीओ / कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला. अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लास मधलं लक्ष उडालेला. शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारा. पण आता आईवडिलांनी कितीही समजावलं तरी, रागवलं तरीही गेम्स खेळणं थांबवू न शकणारा. गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेला. जे विश्व त्याला खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. ज्या विश्वात भयानक वेग, गती, उत्सुकता, हिंसा, जिंकत जाण्याचा फील आहे. त्याला एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे पण त्यातली नशा त्याला पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते.

आणि प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय? अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीयं, मन:शांती हरवलीय, विलक्षण एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याच गणित बिघडून गेलंय. मेरीटमध्ये येण्याची शक्यता असलेला मुलगा नापास होतोय. आईवडील अस्वस्थ झालेत. काय करावं त्यांना सुचत नाहीय.
असे अनेक समर अवतीभवती आहेत. व्यसनात अडकलेले. मी समरच्या आईबाबांशी त्याच्या बालपणाविषयी बोललो. समरशी बोललो. अनेक सेशन्स झाली. त्याची भावनिक जडणघडण, व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं तो introvert, लाजाळू , अबोल आहे. त्याच्यात विलक्षण न्यूनगंड आहे. बाहेरच्या परिस्थितील आव्हानं पेलण्याची त्याची तयारी नाही. मग कृत्रिम वास्तवात म्हणजे गेम्समध्ये जगात भारी ठरता येतंय ह्याचं सुख त्याला वारंवार हवंय. पण त्याच वेळेला आपण आपला अभ्यासाचा महत्वाचा वेळ वाया घालवतोय हा अपराधगंड आहेच. पण तो हतबल झालाय. गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीय. एन्जॉयमेंट म्हणून तो आता खेळू शकत नाहीय. ते compulsion बनलंय.
हीच गोष्ट अनेकांची झालीय. अजय, आशुतोष, पियुष, यश आणि अनेक. त्यातले बरेच शाळेला, कॉलेजला, क्लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडे लक्ष नाही. काळावेळाचं भान नाही. घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. नजर चुकवतात. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. काही विचारलं तर चिडतात. दुरुत्तर करतात. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इन्टरनेट काढून टाकलं तर मोबाईल नाहीतर सायबर क्याफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काहीजणांना पट्कन व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय. सायबर क्याफे जणू दुसरं घर झालंय.
ह्या व्यसनात इतर व्यसनान प्रमाणेच जैविक कारणंही आहेत. खेळत असताना, वाढणारी मेंदूतील endorphin, आणि इतर द्रव्ये एक सुखाचा, धुंदीचा फील देत राहतात . मग उन्माद वाटायला लागतो. त्याची सवय लागली की खेळत नसतानाही त्याच्या स्मृती सुखावत राहतात. मग मेंदूत सतत ती नशेची धून राहतेच.
ह्या सर्व मुलांना वाचवायला हवं. त्यांना वास्तवात जगायची हिम्मत द्यायला हवी. त्यांच्यावरचे ताणतणाव समजून घायला हवेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना मिळवून द्यायला हवी. त्यांची मूल्य दुरुस्त करायला हवी. बाहेरचं जग खरं जग आहे. त्यातले आनंद, जय, पराजय, आव्हानं स्विकारण्यातली गंमत त्यांना समजून द्यायला हवी. काही काळ मग काही कटू निर्णय घ्यावे लागतील. गेम्सपासून त्यांना तोडावं लागेल. पण हे सगळं हळुवारपणे, त्यांना विश्वास देत देत करावं लागेल. काही थेरपीज वापरायला लागतील. समुपदेशन लागेल. आंतरिक शांततेच्या स्त्रोतांची, त्यांच्याशी भेट घडवून आणावी लागेल. मग परिस्थिती बदलेल. निश्चित बदलेल.
समरच्या बाबतीत आता परिस्थिती सुधारतीय. त्याचे आईवडील, शिक्षक, तो आणि मी सगळ्यांनी मिळून team म्हणून काम केलं. व्हिडीओ गेम चा थोडा वेळ आनंद घेणं आणि व्यसनाधीन होऊन जाणं ह्यातला फरक त्याच्या लक्षात आलाय. ह्या पुनर्वसनाच्या निमित्ताने एक चांगली गोष्ट घडली. त्याच्या व्यक्तिमत्वामधले दोष, कमतरता लक्षात आल्या. त्यावर मात करून त्याला स्वत:ला आतून शांत आणि कणखर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु झाले.
व्हिडीओ गेम्सच्या अजगराचा विळखा जगभर वेगात पसरतो आहे. बहुतांशी, न्यूनगंड असलेली, अंतर्मुख असलेली, सोशल नसलेली, मनाने दुर्बल असलेली मुलं ह्या व्यसनात अडकताना दिसतायत. आपण सावध रहायला हवं.