घटस्फोटाच्या प्रक्रिये दरम्यान स्त्रियांपुढील मानसिक आव्हाने/ ताण तणाव – डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ – Article Published in Sunday Sakal

घटस्फोटाच्या प्रक्रिये दरम्यान स्त्रियांपुढील मानसिक आव्हाने/ ताण तणाव -
डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ
सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे आलेली अस्वस्थ सुलेखा आणि आज परिस्थिती तशीच असूनही स्वस्थ, स्थिर चित्ताने, हसतमुखाने पदोन्नतीचे पेढे देणारी सुलेखा, दोन्हीत केवढं अंतर. केवढी आंतरिक स्थिरता तिनं मिळवली होती.
परिस्थिती सोपी नव्हती. सहा वर्षांचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर. घटस्फोटासाठी अर्ज दाखल. पदरी चार वर्षाची मुलगी. नोकरी गेलेली. नवीन करण्याची उमेद खचलेली. नवऱ्याच्या स्वभावामुळे आणि अवास्तव अटींमुळे तडजोडीची शक्यता मावळलेली. नवरा कसलीही आर्थिक मदत द्यायला तयार नाही. तिचे सर्वच हक्क नाकारलेले. उलट जा तुला काय करायचं ते कर ही अरेरावी. आता कोर्ट दरबारी जे काय होईल त्याची वाट पहायची. सुलेखानं खूप सहन केलं होतं. तडजोडीचा प्रत्येक प्रयत्न करून पाहिला. मुलीसाठीतरी हा मार्ग नको असं वाटत होतं . पण अखेर जगणंच असह्य झाल्यावर तीला दुसरा पर्याय उरला नाही. अहंकार आणि संशय शेवटी जिंकले.
तीव्र नैराश्यानं ग्रासलेल्या, उमेद खचलेल्या एका असहाय्य स्त्रीला पुन्हा उभं करायचं होतं. तिला धीर दिला. आव्हानं होती परिस्थिती विनाअट स्वीकारणं. हिमतीनं सामोरं जाणं. पुन्हा नव्यानं आयुष्य उभं करणं. आर्थिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या सक्षम होणं. चूक नसताना निर्माण झालेला अपराधगंड आणि न्यूनगंड काढून टाकणं.
आमची सेशन्स चालू झाली. तिला स्वस्थतेचे काही व्यायाम. ध्यानाच्या पद्धती शिकवल्या. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने कसं पाहायचं, मनात येणारे नैराश्याचे विचार किंबहुना विचारांचे लोंढे कसे थांबवायचे ह्याची तंत्र शिकवली. प्रत्येक व्यक्तीत भावनिक ताकद असते. बौद्धिक क्षमता असतात त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवलं. काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या, ज्या घटस्फोटाच्या तणावयुक्त व अप्रिय प्रक्रियेतून जाव्या लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त आहेत. उदा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला विशिष्ट वेळ लागणारच. त्यासाठी मनाची तयारी करायला हवी. भावनांचा त्रास होणारच. पण तो किती प्रमाणात करून घ्यायचा हे आपण ठरवू शकतो. आपल्या आंतरिक शांततेला धक्का लागणार नाही ह्यासाठीची तंत्रे आपण शिकू शकतो. आपल्या बाबतीत वाईट घडले म्हणजे सगळे जगच वाईट आहे अशी टोकाची भूमिका घेऊ नये. परिस्थिती बदलत असते. आपल्याही आयुष्यात पुढे निश्चित चांगले घडेल ह्यावर विश्वास ठेवावा.
नवऱ्याच्या धमकावण्याना घाबरू नये. घटनेने स्त्रीच्या संरक्षणासाठी संपूर्ण तरतूद केलेली आहे हे लक्षात ठेवावे. त्याचबरोबर व्यक्ती बदलू शकतात ह्यावर विश्वास ठेवावा. त्याच्याकडून तडजोडीसाठी स्वीकारण्यासारखा तोडगा आला. त्यात प्रामाणिकपणा असेल तर विचारपूर्वक पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग असतोच. त्यावेळी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवावा. परंतु कुठल्याही परिस्थितीत आत्मसन्मान ,आदर आणि हक्क ह्यांना ठेच पोहोचत नाही ह्याची खात्री करावी. एकत्र येणे शक्यच नसेल आणि सर्व बाजूने विचार करून जर बाजूला होण्याचा पर्याय स्वीकारावा लागत असेल तर आपल्या आणि मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने बाजूला होणेच योग्य आहे हे मनाला सांगावे. मनाची तयारी करावी व केस निकालात निघेपर्यंत व नंतर आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी. सामाजिक दबावाचा, नातेवाईक, मैत्रिणी काय म्हणतील ह्याचा ताण घेऊ नये. हा कटू निर्णय अंतिमत: आपल्या व मुलांच्या हितासाठी घेतला आहे. कुणालाही कुठलंही स्पष्टीकरण देण्यास आपण बांधील नाही. हा मधला कालखंड अतिशय तणावाचा असू शकतो. त्याकाळात तोल जाऊ शकतो व नको ते शब्द उच्चारले जाऊ शकतात किंवा कृती घडू शकते. त्याने परिस्थिती बिघडू शकते ह्याचे भान ठेवावे.
स्वत:ला शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ ठेवण्यासाठी रोज भरपूर चल पद्धतीचा (वेगात चालणे, जॉगिंग, पोहोणे इ.)व्यायाम करावा. त्याने मेंदूत serotonin व इतर नैराश्य प्रतिबंधक स्त्राव स्त्रवतील. तुम्हाला उत्साही राहायला मदत मिळेल. ध्यान, स्वस्थतेची तंत्रे ह्याने मन स्थिर रहायला मदत होईल. अंतर मनाचं सामर्थ्य अफाट असतं. आपण स्वत:ला कणखर बनवू शकतो. सकारात्मक स्वयंसूचनेचे तंत्र शिकून घ्यावे. creative visualization ची तंत्रे शिकून घ्यावीत. त्याचा खूप उपयोग होतो. दिवसभर मधून मधून श्वास पहात राहावा. शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना त्रयस्थपणे न्याहाळायला शिकावे. ह्या सर्व गोष्टींमुळे स्वस्थ होणं, साक्षीभावाने परिस्थिती न्याहाळणे आणि विना अट तिचा स्वीकार करणे किंवा आवश्यक ती कृती करणे शक्य होते. विरुद्ध बाजूकडून (पती वा पत्नी) काहीही बोललं गेलं किंवा कृती झाली तरी आपण ताबा न ढळू देता विचारपूर्वक उत्तर द्यायचय किंवा कृती करायचीय हे लक्षात ठेवावे.
आपण ठाम असणं आवश्यक असलं तरीही न रागावणं किंवा भावनेच्या आधीन न जाणं महत्वाचे आहे. ह्या कठीण काळात आपण आपल्या भावना, अस्वस्थता, योग्य व्यक्तीपाशी, तज्ञापाशीच व्यक्त करणे आवश्यक आहे. तज्ञ आपल्याला सकारात्मक पद्धतीनं मोकळं व्हायला मदत करू शकतात. योग्य रीतीने भावना हाताळण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात.
सुलेखाने हे सर्व शिकून घेतलं. होणारा घटस्फोट हा आयुष्याचा अपरिहार्य टप्पा म्हणून स्वीकारला. आयुष्य अनित्य आहे आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत ह्याचा स्वीकार केला. स्वत:तील क्षमतांचा पुरेपूर वापर केला. नवीन नोकरी स्वीकारली आणि तिच्या कौशल्यांमुळे तीला आज प्रमोशनही मिळाले. पाणी वाहतं राहिलं. आता घटस्फोटाच्या केसचा निकाल लवकरच लागेल. तो काहीही असो पण कठीण परिस्थितीत कणखर रहाता येतं, स्वत:त positive transformation घडवून आणता येतं, हे तिनं दाखवून दिलंय.