Category Archives: Uncategorized

मुलांचा व्यक्तिमत्व विकास

मुलांचा व्यक्तिमत्व विकास
– डॉ विद्याधर बापट
आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास ” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्वाचं. असं व्यक्तिमत्व विशिष्ठ प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं ? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey). म्हणजेच आतलं विश्व शांत,स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं म्हणता येईल.
सुरवात महत्वाची – ह्या सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी. व्ही. वर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
व्यक्तिमत्व विकासातील काही महत्वाची साध्ये. – मुलांमध्ये रुजवायला हवं की – १. माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्या पेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. व निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्वं मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल.
२. माझं “आतलं ” विश्व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्विकारीन. ३. आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. ४. मी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. ५. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन.
६. ह्या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे.
दोन्ही दिशांनी (Inner Journey व Outer Journey ) करावयाच्या प्रयत्नांमध्ये मध्ये काय येतं? – वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग बनवण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर, आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम म्यानेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणा खाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, , नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक, व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization), ह्यासाठीची तंत्रे शिकून घेणे.
विकसित व्यक्तिमत्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात – १. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. २. ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात. ३. कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. ४. यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. ५. नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात ६. संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात. ६. आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते. ७. केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात. ८. स्वत: च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.
पालकांची जबाबदारी -
१. ह्या सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठींबा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुणावगुण टिपत असतात.
२. मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता ह्याकडे दुर्लक्ष्य करू नये. मोठा झाला की आपोआप सगळं ठीक होईल ह्या गैरसमजात राहू नये.
३. करियर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांच्यावर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे.
४. आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करीत राहणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.
समृद्ध व्यक्तीमत्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्ब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशु पक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी ( लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती ह्या गोष्टी जीच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी.
आजच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्य शिक्षण व आंतरिक स्वस्थता ह्या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.

मुग्धाची गोष्ट – डॉ. विद्याधर बापट

मुग्धाची गोष्ट
– डॉ. विद्याधर बापट
प्रिय मुग्धा, माझ्या बाळा, माझ्या भावना तुझ्यापर्यंत नीट पोहोचतील की नाही, तुला समजतील की नाही कळत नाहीय. तुझं वयच नाही गं तेवढं. पण मी बोलून मोकळी नाही झाले तर घुसमटून जाई पुरती. म्हणून मोकळी होतेय. केवढीशी तू. अन काय सोसायला लागलं तुला? तुझ्या बाबतीत घडलेलं आज जे कळलं त्यानं मी पुरती हादरलेय. पायाखालची जमीनच सरकलीय. सात आठ वर्षांची अल्लड, निरागस, निष्पाप माझी मुलगी तू मुग्धा. तुझ्याच वाटेला का हे सगळं ? आम्ही कुणाचं काय वाईट केलं म्हणून ही शिक्षा? गेले दहा पंधरा दिवस आपलं सगळं कुटुंब विलक्षण ताणाखाली होतं. तुझ्या बाबतीत विचित्र गोष्टी घडत होत्या. रात्री दचकून उठायचीस. दिवसा अचानक रडायला लागायचीस. सारखी चिडायचीस. खेळणं बंद झालेलं. बोलणं जवळ जवळ नाहीच. निर्जीव नजरेनं कुठेतरी शून्यात पहात राहायचीस. आम्ही खूप विचारलं पण काहीही सांगायला तयार नाहीस. टी.व्ही. वर चार दिवसांपूर्वी तुझ्या आवडीचा सिनेमा लागला होता. मुद्दाम बघायला बसवलं. एका दृश्यात नायक नायिकेला जवळ घेतो असा सीन होता. अचानक तू जोरात ओरडलीस अन आत निघून गेलीस. अजितने, तुझ्या बाबाने शेवटी तज्ञांची मदत घ्यायची ठरवली. आज तपासण्या पूर्ण झाल्या अन जे निष्कर्ष आले, त्याने नैराश्य, हतबलता, संताप ह्याही पलीकडे आम्हाला आमच्या मुग्धाच्या भविष्याची विलक्षण काळजी वाटली. तू लैंगिक शोषणाची बळी ठरली होतीस. ते ही आपल्याच ओळखीच्या, विश्वासातल्या व्यक्तीकडून. त्या विकृत व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई होईलही. पण आमच्या मुग्धाच्या भविष्याचं काय? तीच्या भावविश्वाचं काय ?
डॉक्टरांच्या शब्दांनी, खूप विश्वास दिलाय. आपण सगळ्यांनी मिळून, टीम म्हणून ह्या संकटाला तोंड द्यायला हवं म्हणाले. मुग्धावर आवश्यक ते उपचार होतील. ती सावरेल. नक्की सावरेल, म्हणाले. मनाच्या जखमा भरायला काही काळ जावाच लागेल. पण तिचं भावविश्व पुन्हा उभं राहील. तारुण्यात पदार्पण करताना घडलेल्या घटनांकडे एक अपरिहार्य वास्तव म्हणून विना अट स्वीकारायची हिम्मत आणि समजूतदारपणा तिच्यात आपण निर्माण करायचाय. तीचा भविष्यकाळ, भूतकाळात घडलेल्या घटनांनी प्रदूषित होणार नाही ह्यासाठी सर्व काळजी घ्यायचीय. माझा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. मी आणि अजित तुला पुन्हा उभं राहण्यासाठी जीवाचं रान करू. तुझं व्यक्तिमत्व तुला पुन्हा परत मिळायलाच हवं. विशेषत: पुरुष ह्या जेन्डर विषयी तुझ्या मनात विखार उत्पन्न होता काम नये. सर्वच पुरुष असे विकृत नसतात गं. किंबहुना खूप सुसंस्कृत, स्त्रियांना सन्मानानी वागवणारे असेही असतात. तुझ्या बाबाचं उदाहरण तुझ्यासमोर आहेच.
माझ्या डोळ्यांतल्या पाण्याला खळ नाही. पण मला ही सावरायला हवं माझ्या बाळासाठी. …आई

आज अवतीभवती अनेक मुग्धांच्या बाबतीत, काहीवेळा मुलांच्याही बाबतीत अशा दुर्दैवी घटना घडतात. वासनांध, विकृत व्यक्ती ही घृणास्पद कृत्ये करतात. बहुतेक वेळा ह्या व्यक्ती मुलांच्या माहितीतील असतात. त्यामुळे घटना घडण्यापूर्वीचे त्यांचे पवित्रे लहान अजाण मुलींच्या मुलांच्या लक्षात येत नाहीत. लैंगिक शोषणामध्ये बलात्कारासारख्या घटनां बरोबरच पुढील गोष्टीही येतात. शरीराला नको त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्पर्श, किंवा एखाद्या वस्तूच्या सहाय्याने स्पर्श करणे . प्रत्यक्ष संभोग किंवा संभोगाचा प्रयत्न,मुलांना घाणेरडी चित्रे, फिल्म्स दाखवून तसे करण्यास सांगणे, त्यांच्याकरवी, समोर हस्तमैथुन करणे, वेगवेगळ्या विकृत मार्गांनी मुलांकडून वासना तृप्ती करवून घेणे. ही यादी खूप लांबवता येईल कारण वासनांध विकृतांच्या कल्पनाशक्तीला सीमा नाही.
मुलांनी ह्या गोष्टी कुणाला सांगू नयेत व आपली ही विकृत कृत्ये अशीच चालू रहावीत ह्यासाठी मुलांना आमिषं दाखवली जातात. भेटी दिल्या जातात. धमक्याही दिल्या जातात.
मुलामुलींवर काय परिणाम होतो – post traumatic disorder तसेच नैराश्याच्या आजारां बरोबरच ह्या घटनांचे अतिशय गंभीर परिणाम एकूण व्यक्तिमत्वावर होऊ शकतात. मोठेपणी लक्षात येणाऱ्या अनेक मानसिक आजारांची मुळे अशा कोवळ्या वयातल्या घटनांशी संबंधित असू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. नैसर्गिक लैंगिक भावनांची, व्यवहारांची भीती बसू शकते. एकूणच भीती, अनेक गंड मनात राहू शकतात. आयुष्य व्यापून टाकू शकतात.
मुलांच्या बाबतीत असं काही घडलं असू शकतं ह्याची वागणुकीतील लक्षणे – अचानक वागण्यात अनपेक्षित फरक होणे. अचानक बेफाम, आक्रमक वागायला लागणे, शाळा बुडवणे ,अचानक अंथरुणात लघवी करण्याची सवय, रात्री झोप न येणे, दचकून जागं होणे, घाणेरडी स्वप्नं पडणं, मूड मध्ये सारखे बदल, स्वत:ला इजा करून घेण्याचा प्रयत्न, स्वत:च्या शरीराविषयी घृणा वाटणे, सारखी आंघोळ करावीशी वाटणे, स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष करणे, शून्यात नजर लावून विचार करत बसणे, अचानक रडायला येणे, बोलणं बंद/कमी होणं, घाबरणे, नातेवाईक, खूप माणसं असतील तिथे जाण्याची भीती वाटणे, काही मुलांच्या बाबतीत – अत्यंत घाणेरडं बोलणं, घाणेरड्या शिव्या द्यायला सुरवात होणे. विशिष्ट व्यक्ती घरात आल्यावर, बाहेर दिसल्यावर विलक्षण दडपणाखाली वावरणे.
ह्या शिवाय लैंगिक अवयावांसंबंधी शारीरिक लक्षणे असू शकतात.
आपण काय करायला हवं ? – लैंगिक शोषणाची शंका आली किंवा न आली तरी लक्षणे दिसताच वेळ न दवडता तज्ञांची मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर मुलीला, मुलाला मदत मिळेल तेवढं चांगलं. अवघड असलं तरी,आपण स्वस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा त्याने मुलाच्या धैर्यावर अनुकूल परिणाम होईल. मुलामुलींवर अजिबात रागावू नये. तुझ्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नाही, तू अपराधी नाहीस ह्याची खात्री द्यायला हवी. आपण त्याच्या पाठीशी ठाम उभे आहोत ह्याचा विश्वास तीला, त्याला वाटायला हवा. पुन्हा पुन्हा काय घडलं हे मुलांना विचारू नये. तज्ञ सर्व व्यवस्थित हाताळतील. आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
सर्वच पालकांची जबाबदारी कुठली ? – १. मुलांबरोबर निकोप प्रेमाचं नातं असावं. संवाद असावा. म्हणजे मुलं आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी मोकळेपणानं बोलतील.
२. मुलांना जुजबी पण आवश्यक लैंगिक प्रशिक्षण द्यायलाच हवं. आपल्या गुप्तांगाला (private parts) कुणीही स्पर्श करता काम नये हे शिकवायला हवं. आपल्याला हे अवघड जात असेल, संकोच वाटत असेल तर ह्या शिक्षणासाठी तज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी.
३. दुर्दैवाने असा प्रसंग घडण्याची शक्यता वाटल्यास मुलांनी न घाबरता पालकांना सांगावे. पालकांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये.
४. ओळखीच्या व्यक्तीलाही शरीराशी लगट करू देऊ नये. तसा प्रयत्न झाल्यास मुलामुलींनी जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न करावा. ओरडावे, तेथून पळ काढावा व पालकांना सांगावे.
५. ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या खाऊ, भेटवस्तू इत्यादींविषयी पालकांना न विसरता सांगावे.
६. आपल्या शरीरावर आपलं स्वामित्व आहे आणि त्याला स्पर्श करू द्यायला नकार देणं हा आपला अधिकार आहे हे मुलांमध्ये रुजवावे.
सध्या अवतीभवती सतत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अतिशय वेदनादायी आहेत. वाईट आहेत. आपली मुलामुलींच्याही संवेदनशील मनावर त्याचं दडपण येऊ शकतं. मुलामुलींवर हे बिंबवायला हवं की असं घडणं निश्चितच वाईट आहे. पण आपण सतत त्या दडपणाखाली राहण्याची गरज नाही. तर धैर्याने, प्रयत्नपूर्वक स्वत:ला खंबीर करायला हवं .

झोप Published In “Sunday Sakal”

झोप
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
माणसाला झोप का येते आणि झोपेची आवश्यकता का आहे ह्या बद्दल आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी अनेक थिअरिज मांडल्या आहेत पण एक नक्की की आपण कार्यक्षम राहण्यासाठी , उत्साहासाठी, भावनिक समतोलासाठी, एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शांत झोप अत्यावश्यक आहे.
आपण रात्रीच का झोपतो? तर शरीरामध्ये असलेले जैविक घड्याळ (Biological clock) किंवा circadian clock जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलत राहते ह्यांच्याशी झोपेचा संबंध आहे. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो तसं तसं शरीरात मेलोटोनीन नावाचे संप्रेरक स्त्रवू लागतं आणि झोप येऊ लागते. मेंदूतील wave activity, संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्वाची कार्ये ह्या घड्याळाशी, पर्यायाने झोपेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
झोप का महत्वाची आहे त्याची कारणे-
चांगल्या, शांत, पुरेश्या झोपेमुळे -
१. हृदय निरोगी रहाण्यास मदत होते. – अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब व रक्तातील क्लोरेस्टोलशी आहे.
२. ताणतणाव कमी होतो- स्ट्रेस संप्रेरके कमी स्त्रवतात. पर्यायाने रक्तदाब नियमन व हृदयासाठी उपयुक्त.
३. स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली रहाते- शरीर झोपलेले असले तरीही मेंदू, दिवसभरातील व पूर्वीच्या घटना, भावना, स्मृती, अनुभव वगैरेंची सांगड घालून memory consolidation चे (स्मृतींच्या फाइल्स तयार करण्याचे) महत्वाचे काम करत असतो. जे आपल्या भविष्य काळासाठी अतिशय महत्वाचे असते.
४. उत्साह व सतर्कता – चांगली झोप आपल्याला उत्साही तसेच सतर्क बनवते. तसेच दुसऱ्या दिवशी चांगली झोप मिळण्याची एक चांगली शक्यता निर्माण होते.
५. दुरुस्ती व देखभाल – झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात ज्याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना ह्यासाठी होतो.
६. नैराश्य कमी होण्यास मदत – मेंदूत सेरोटोनीन हे संप्रेरक योग्य प्रमाणात स्त्रवल्यामुळे नैराश्याची शक्यता किंवा नैराश्य कमी होण्यास मदत होते. उत्साह वाढतो.
७. शारीरिक आजार बरे होण्यास व एकूणच प्रतिबंध होण्यास मदत – निद्रानाशामुळे स्ट्रेस सम्प्रेरकांमुळे होणाऱ्या मानसिक तणावजन्य आजारांबरोबरच आर्थ्रायटीस, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी निर्माण होत असतात. शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते. ह्या सर्वांना शांत, नियमित झोपेमुळे प्रतिबंध होतो.
पण अनेकांना झोप न येण्याचा म्हणजेच निद्रानाशाचा आजार असतो.
निद्रानाश किंवा झोप न येणे ह्या आजारात साधारण पुढीलपैकी एक किंवा जास्त लक्षणे दिसतात – १ अजिबात झोपच न येणे २. मध्यरात्रीच उठून बसणे व पुन्हा झोप न येणे ३. सकाळी खूप लवकर जाग येणे ४. झ़ोपेतून जागे झाल्यावर अतिशय थकवा वाटणे. ५. वेडीवाकडी, संदर्भ नसलेली स्वप्ने पडणे व सकाळी अस्वस्थता जाणवत रहाणे.
निद्रानाशाचे ढोबळ मानाने दोन प्रकार असू शकतात. १. प्रायमरी निद्रानाश – ह्या प्रकारात व्यक्तीचा निद्रानाश कुठल्याही इतर शारीरिक आजाराशी निगडित नसतो. सेकंडरी निद्रानाश – ह्या प्रकारात झोप न येणे हे कुठल्या ना कुठल्या शारिरिक किंवा मानसिक व्याधीशी निगडित असते. उदा. अस्थमा, अर्थाइट्रिस, कर्करोग, हृदयविकार, मानसिक व्याधि, नैराश्य, वेदना, व्यसनाधिनता इ.
निद्रानाश हा कमी कालावधीसाठी (Acute Insomnia) किंवा जास्त कालावधीसाठी (Chronic Insomnia) असू शकतो.
निद्रानाशाची कारणे पुढील असू शकतात. – १. आयुष्यातील महत्वाच्या तणावकारक घटना उदा. जवळील व्यक्तीचा मृत्यु, घटस्फोट, अचानक नोकरी जाणे २. शारीरिक आजारपण व वेदना ३. भावनात्मक ताणतणाव ४. काही औषधांचे साइड इफेक्टस ५. नैराश्य ६. दबलेली असुरक्षितता, भीति इ. ७. सतत च्या नाइट शिफ्ट्स किंवा प्रवासामुळे झोपेचे बिघडलेले रूटीन ८. व्यसने ९. मोबाइल्स किंवा इंटर नेटचे व्यसन १०. जुना chronic ताण तणावाचा आजार
निद्रानाशामुळे काय होते ?- दिवसभर ग्लानी येणे, थकवा वाटणे, चीड चीड होणे, एकाग्रता न होऊ शकणे तसेच विस्मरण होणे, निरुत्साह, निर्णय क्षमता घटणे, शारिरीक वजन वाढणे, प्रतिकार शक्ती घटणे , मधुमेह, हृदयविकार, पचनाच्या तक्रारी व इतर शारीरिक आणि मानसिक व्याधी ह्या गोष्टी असू शकतात.
झोपेच्या स्टेजेस प्रामुख्याने दोन. Rem स्लीप (Rapid Eye Movement) ही सुरवातीची पायरी ज्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणं इ. घडतं. दुसरी स्टेज Non-Rem स्लीप जिच्या मध्ये आपण साधारण तीन पायऱ्यांमध्ये आपण जास्त जास्त गाढ झोपेत जातो. ही खूप महत्वाची. खरी झोप. डीप स्लीप. ह्या पायऱ्या आलटून पालटून येत असतात व त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. अनेकांची, आपण खूप वेळ झोपतो तरी झोप झाल्यासारखे वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, अशी तक्रार असते. ह्यांच्या बाबतीत डीप स्लिपची पायरी खूप कमी वेळा येते व कमी काळ टिकते.
तीव्र निद्रानाशाचा त्रास बराच काळ असेल तर वेळ न दवडता तज्ञांना भेटावे. निद्रानाशाच्या कारणांच्या मुळाशी जाउन उपचार करणे आवश्यक असते. निद्रानाशाच्या मागील शारीरिक व मानसिक कारणे शोधून योग्य ते आवश्यक उपाय योजना करणे शक्य असते. औषधे तसेच, तणाव नियंत्रणाचे तंत्र, स्व-संमोहन थेरपी, स्लीप रेस्टरिक्शन थेरपी, रिकंडीशनींग थेरपी, बिहेवियरल थेरपी असे अनेक उपचार उपयुक्त असतात.
ज्यांना सौम्य निद्रानाशाचा त्रास होतो त्यांच्यासाठी काही टिप्स – १. शक्यतो रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ ठरवून पाळावी. २. संध्याकाळनंतर चहा, कॉफी इ. पेये घेऊ नयेत. ३. रोज भरपूर व्यायाम करावा. परंतु व्यायाम व रात्रीची झोप ह्यामधील अंतर तीन ते चार तासांचे असावे. ४. रात्री उशिरा व जड जेवण जेवू नये. रात्रीचे जेवण व झोपेची वेळ ह्यात किमान दीड-दोन तासांचे अंतर असावे. ५. झोपण्यापूर्वी ध्यान-धारणा, संगीत ऐकणे, शक्य असल्यास स्नान करणे उपयुक्त ठरते. ६. मनात काळजीचे किंवा अस्वस्थतेचे विचार येत असतील तर त्यांची एक यादी बनवावी व स्वत:ला सांगावे की ह्याबद्दल मी उदया “worry time ” (काळजीचे विचार करण्याची विशिष्ट वेळ) मध्ये विचार करीन. सोयीने तसा दिवसातला worry time ठरवून घ्यावा. व त्यावेळी काळजीच्या प्रश्नांवर विवेक पूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. न जमल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. परंतु झोपेची वेळ ही प्राध्यान्याने महत्वाची आहे हे स्वत:शी ठरवून टाकावे व शांत राहावे.
शरीराच्या व मनाच्या गरजेप्रमाणे आवश्यक अशी शांत आणि पुरेशी झोप हे चांगल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.

Fear in childhood

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
मोठेपणी मन कणखर त्याचवेळी भावनिक दृष्ट्या समतोल व्हायला हवं असेल तर लहानपणापासूनच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. लहानपणी मनात रुजलेली भीती, न्यूनगंड इत्यादी व्यक्तिमत्व विकासाच्या आड येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींकडे वेळेवर लक्ष देणं महत्वाचं ठरतं. लहानपणी बहुतेक सर्वांनाच कसली ना कसली भीती वाटलेली असते. कधी अंधाराची, कधी गोष्टीतल्या किंवा टी. व्ही. सिरियल मधल्या भूताची. पण कालांतराने त्या भितीतला फोलपणा जाणवायला लागतो आणि ती नाहीशीही होते. पण अतिसंवेदानाशील अशा ब-याच लहान मुलांच्या बाबतीत हे सहजासहजी घडत नाही. इतरही काही कारणांमुळे निर्माण झालेली भीती,असुरक्षितता आत खोल रुजून राहिलेली आढळते. ही असुरक्षितता नंतर तीचं स्वरूप बदलते. मोठेपणी व्यक्तिमत्वाची, स्वभावाची वीण बनताना तीचा अविभाज्य भाग बनू शकते.
लहानपणी वयानुसार वाटणारी स्वाभाविक भीती म्हणजे-अगदी लहान बाळांना अनोळखी त्रयस्थ व्यक्तीची वाटणारी भीती, दहा महिने ते दीड वर्षं ह्या वयात आई किंवा वडील आपल्या पासून दूर होताना, जाताना बाळाचं अस्वस्थ होणं, वय वर्षे चार ते सहा दरम्यान वाटणारी गोष्टीतल्या भूतांची, राक्षसांची भीती तसेच अंधाराची भीती, साधारण सात ते दहा ह्या वयात आजूबाजूच्या घडणाऱ्या वास्तव प्रसंग, उदा. मृत्यू, अपघात, घातपात व दहशतवादाच्या बातम्या, चित्रे, दृश्य ह्यांची भीती. ह्या सगळ्या भीती कालांतराने नाहीशा होणं गरजेचं असतं.
पण काही अति संवेदनाशील मुलांच्या बाबतीत काही भीती वा अस्वस्थता व्यक्तिमत्वातील असुरक्षिततेचं कारण ठरू शकतात. उदा. शाळेत वर्गात इतर मुलांकडून झालेली टिंगल, शिक्षकांनी चूक नसताना केलेली हेटाळणी, तुला काहीच जमत नाही, जमणार नाही अशी शिक्षक, नातेवाईक ह्यांच्याकडून सतत केली गेलेली नकारात्मक टिपण्णी. ह्यातून निर्माण होणारा न्यूनगंड, आपण निरुपयोगी असल्याची भावना पुढे प्रगतीच्या आड येऊ शकते. मोठेपणी सगळ्यांसमोर, समूहासमोर बोलताना वाटणाऱ्या भीतीचं मूळ लहानपणी वर्गात मुलांकडून केल्या जाणाऱ्या टिंगलीत किंवा शिक्षकांनी सर्वांसमोर केलेल्या अपमानात असू शकतं. मुलींच्या बाबतीत न कळत्या वयात अनुभवले गेलेले गलिच्छ स्पर्श ह्यांचाही निकोप विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
ज्या मुलांमध्ये अतिरिक्त काल्पनिक भीती वा अस्वस्थता जाणवते ,त्यांच्या बाबतीत पुढील कारणे असू शकतात – १. अनुवंशिकता- ही मुले अतिसंवेदानाशील, हळवी असू शकतात. २.- पालकांपैकी एकजण किंवा दोघेही अस्वस्थ वा असुरक्षित असतात. ३. – पालकांनी मुलांची अनाठायी किंवा अतिरिक्त काळजी घेणं ज्यामुळे मुलांना वास्तवातल्या प्रसंगाला, संघर्षाला तोंड देण्याची क्षमता विकसित होत नाही. ४. – काहीवेळा मुलांच्या दृष्टीने निर्माण होणारे दुर्दैवी प्रसंग उदा. पालकांचा घटस्फोट, घरातील जेष्ठांचा मृत्यू, अपघात, इस्पितळातले किंवा घरातले मोठे आजारपण
सतत आतून वाटणारी अतिरिक्त भीती वा अस्वस्थ असणाऱ्या मुलांमध्ये पुढील लक्षणे जाणवायला लागतात. – १. चंचलपणा, अधीरता वा उतावळेपणा २. – मंद हालचाली ३.- कमी झोप किंवा जास्त झोपणे ४.- तळव्यांना सतत घाम ५.- नॉशिया, डोकेदुखी व पोटदुखीची तक्रार व त्यामुळे शाळेत न जाणे. ६.अभ्यासात एकाग्रता न होऊ शकणे व मार्क्स कमी व्हायला लागणे. ७. चिडचिड करणे, प्रमाणाबाहेर रागावणे. ८. एकटं एकटं रहाणे. इतर मुलांमध्ये न मिसळणे ९. घरी पाहुणे आल्यास बुजणे तसेच सोशल समारंभात भाग घ्यायचा टाळणे
काही मुले काल्पनिकता (fantacy) आणि वास्तविकता (reality) ह्यात फरक करू शकत नाहीत आणि इथेच भीतीचा उगम होतो. कुठलीही भीती किंवा अस्वस्थता जर प्रमाणाबाहेर आहे असं वाटलं तर तातडीने तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. लहान मुलांसाठी ह्या भीती किंवा अस्वस्थतेचं निवारण करण्याच्या खूप चांगल्या उपचार पद्धती असतात. भीतीचं निर्बलीकरण (Systematic Desensitization) म्हणजे सावकाश, पायरी पायरीने भीतीवर मात करण्याच्या पद्धती तज्ञ शिकवू शकतात. लहान मुलांसाठी स्वस्थतेची, तणाव नियोजनाची तंत्रे असतात. ती उपयुक्त ठरू शकतात.
पालकांनी नेमकं काय करायला हवं ? – तर समजून घ्यायला हवं की भीती आपल्यासाठी काल्पनिक असली तरी मुलाला ती खरी भासते. त्यामुळेच त्याला अस्वस्थता येते. अशा स्थितीत खूप आश्वासक, प्रेमळ शब्दात त्याला समजावून सांगावं. त्याला रागावू नये किंवा त्याची चेष्टा करू नये. भीतीवर मात करण्यासाठी त्याला मदत करावी. पण काल्पनिक भीतीला खतपाणी घालू नये. उदा. रात्री झोपताना मुलांना खोलीबाहेर, दुसऱ्या खोलीत किंवा कपाटात भूत आहे असं वाटतं. त्यावेळी मुद्दाम कपाट उघडून “बघ, आत काही भूतबित नाहीय” असं सांगू नये. कारण त्यामुळे भूत असतं पण आत्ता आत काही नाहीय असा अर्थ ते काढू शकतात. त्या ऐवजी भूत नावाची गोष्टच नसते अशा पद्धतीनं समजवावं. तसंच “अंधाराला घाबरण्यासारखं काही नसतं. सूर्य मावळला की प्रकाश नाहीसा होतो. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, प्रकाश नसणे”, ह्या पद्धतीनं समजावून सांगावं.
शिक्षकांचा ह्या बाबतीतला सहभाग फार महत्वाचा आहे. घराप्रमाणेच शाळेमध्येही मुलांना समजून घेणे, धैर्य देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे ह्या गोष्टी शिक्षक करू शकतात. मुलांचा बराचसा वेळ शाळेत जातो. त्यामुळे तेथे त्याला आश्वासक वातावरण मिळणे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरते.
लहानपणीच जर अनाठायी, काल्पनिक भीतीची मुळे खुडली गेली तर सकस व्यक्तिमत्वाचा वृक्ष भविष्यात नक्की बहरू शकतो. आजच्या काळाची ही गरज आहे.

“ हलो आई “ डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ञ – Published In Sunday Sakal

“ हलो आई “
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ञ
हलो आई,
अगदी राहवेना म्हणून तुला काही सांगायचं ठरवलंय मी आज . मला माहितीय मी खूप लहान आहे अजून. लहान म्हणजे काय.. अगदीच लहान.. खरं तर मला वयच नाहीय ! .. जन्मालाच यायचोय ना मी अजून. माझा मुक्काम आहे तुझ्या पोटात.. मस्त मजेत आहे मी. तुझ्या मायेच्या उबेत.. सुरक्षित.. पण खरं सांगू का आई ? फक्त तुझ्यात आणि माझ्यातच ठेव हं हे .. तू सगळं छान करतेयस माझं . खाणं, पिणं, व्यायाम, माझी शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ चांगली व्हावी म्हणून गर्भसंस्कार. सगळं छानच. पण अलिकडे थोडसं अस्वस्थ वाटतं मला. भीतीसुद्धा वाटते कधीकधी. तुझी नाही गं .. ती तर कधीच वाटणार नाही.. तुझाच तर भाग आहे ना मी. मला अस्वस्थ वाटतंय माझ्या आसपास जे घडतंय ना.. त्यामुळे. बोलू ना मोकळेपणानं ? .. हं .. मग सांगतोच सगळं.. परवा रात्री तुझं आणि बाबाचं भांडण झालं जोरजोरात. तशी तर तुमची भांडणं सारखीच होतात. पण परवाचं अगदी टोकाचं. केवढ्या जोरजोरात? बाबा म्हणाला ” फार झालं आता. जमत नसेल तर वेगळं होऊ दोघे.” तुही ओरडलीस ” माझीही इच्छा नाहीय आता एकत्र रहाण्याची”. मग एकदम शांतता. मी घाबरूनच गेलो. आणि माझी दीदी सुद्धा. ती सुद्धा केवढीशी आहे अजून. दुसरीत जाणारी . म्हणजे लहानच की नाही गं? रडायलाच लागली ती. तीला जवळ घ्यायचं सोडून रागावलीस तीला ” आता हिला काय झालं भोकाड पसरायला? जा जाउन झोप तिकडे त्या खोलीत. लवकर उठायचंय सकाळी. शाळा आहे. रिक्षा येईल. चल जा आधी.” आता तुमच्या भांडणात दिदीची काय चूक झाली? .. कमालच झाली म्हणजे.. तरी मी तुला सारखा पायांनी ढकलत होतो आतून. पण लक्ष कुठे होतं तुझं? पुन्हा भांडण सुरु. मग पुन्हा एकदा त्या डॉक्टर काकांकडे जायचं ठरलं.. शेवटचं.. मग लाईट घालवलेत.. नंतर ती नकोशी शांतता.. रात्रभर जागीच होतीस तू.. अस्वस्थ .. मग मला कुठली शांत झोप?
काल डॉक्टरकाकांकडे गेलात दोघं. किती छान समजावून सांगितलं त्यांनी तुम्हाला? म्हणाले ” वेगळं होण्याची परिस्थिती आहे असं मला अजूनही वाटत नाही. सहजीवन हे आनंदासाठी असतं. दोघानीही थोडं समजून घ्या. आयुष्य आणि संसार प्रेमावर, विश्वासावर उभा रहातो. संशय आणि अहंकार शत्रू क्रमांक एक. लहान सहान कारणांवरून भांडणं चांगली नाहीत. मला हवं तसंच दुसऱ्यानं वागलं पाहिजे हा आग्रह नेहमीच बरोबर नाही. समोरच्याचीही काही बाजू असू शकते. आज एक गोंडस मुलगी पदरात आहे. एक मुल पोटात आहे.. म्हणजे मी.. त्यांच्या भवितव्याचा विचार करा. त्यांच्यावर काय परिणाम होईल? त्यांच्यात भावनिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते. आणि पुढे व्यक्तिमत्वावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही दोघंही सुशिक्षित आहात. दोघंही मिळवते आहात. विचार करण्याची पद्धत बदलायची आणि मुख्य म्हणजे अहंकार सोडायचा. बस.”
आई, हा अहंकार काय प्रकार आहे गं? काहीतरी फार भारी प्रकरण दिसतंय.. डॉक्टर काकांकडच्या सगळ्या मिटींग्स मध्ये हे सांगतातच . त्यांनी शांत होण्यासाठी, स्वभाव बदलण्यासाठी, विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी काही मनाचे व्यायाम सांगितले होते. पण तुम्ही ते काही न करता नुसते भांडतच रहाता. मला आणि दिदीला किती त्रास होतो त्याचा? आणि एक महत्वाचा मुद्दा.. माझं जाऊ दे. मी तर अजून यायचोच आहे जगात. पण दिदीची काय अवस्था झालीय..आपण दोघं गेलो होतो ना तीच्या शाळेत मागे? टीचर सांगत होती .. मुलगी हुशार आहे पण अभ्यासात एकाग्रता होत नाही..टेन्शन आहे कसलं तरी. घाबरून घाबरून असते सारखी. मिसळत नाही मुलांच्यात म्हणावी तशी. एकदा काउन्सेलरला भेटा. काय झालंय आई तीला? घरी सुद्धा हट्ट करते सारखी. नाहीतर हिरमुसलेली असते. रडते. चिडते. डॉक्टरकाका म्हणाले, हे काही केवळ तुमच्या दोघांच्या भांडणामुळे नाहीय. पण आई वडिलांच्या मधल्या तणावाचा मुलांवर परिणाम होऊ शकतो म्हणाले. मलाच टेन्शन आलंय. मला खूप आवडते दिदी. आपण तिघंच असलो की पोटावरून हात फिरवते तुझ्या. लाड करते माझे. गोड गोड बोलते माझ्याशी. किती छान वाटतं तेंव्हा. आणि आई खरं सांगू ? बाबाही आवडतो मला. म्हणजे तुम्ही दोघंही. आपण राहू या ना सगळे मिळून ! सोडून नाही जाणार ना तुम्ही आम्हा दोघांना ? मी प्रॉमिस देतो. कधी त्रास नाही देणार मी तुम्हा दोघांना? खूप मोठा होईन. नक्की.. हे जग म्हणे खूप असुरक्षीत होत चाललंय. म्हणजे काय मला कळत नाही. पण तुमच्या दोघांची मायेची पाखर जर असेल आम्हा दोघांवर तर किती सुरक्षित वाटेल आम्हाला? रागावू नकोस हं आई. जरा जास्तच बोललो म्हणून. शेवटी तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे गं आणखी? ..
तुझा सोनूला आणि बाबाचा पिट्टू

ही मुलं असा का विचार करतात? डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ञ Published in Sunday Sakal

ही मुलं असा का विचार करतात?
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ञ

पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट. संध्याकाळी, भांडारकर रोड वरून फिरायला चाललो होतो. अंधारून आलेलं. एका बियर बार शेजारच्या कट्ट्यावर यश दिसला. वय १७- १८ . इंजिनियरिंगचा विद्यार्थी. मला पाहताच चेहरा लपवण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या लक्षात आला. मीही लक्ष नसल्यासारख दाखवलं. घरी पोहोचलो तरी त्याचा घाबरलेला आणि भकास चेहरा समोर येत राहिला. काही महिन्यांपूर्वी त्याची आई भेटून गेली होती. यश विषयी ब-याच गोष्टी सांगत होती. त्याची काळजी वाटत होती.सतत घराबाहेर रहाणं, घरात चिडचिड करणं, उलट उत्तर देणं, सतत T V पहात रहाणं, रात्री उशिरा पर्यंत मोबाईल आणि इंटरनेट वर खेळत रहाणं, ह्या आणि अश्याच अनेक तक्रारी सांगत होती. मी म्हंटल कदाचित वयाचा दोष असेल. ह्या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल मुलांमध्ये घडत असतात. growing pains . काही काळ लक्ष ठेवा. आत्ताच घाबरून जाण्यात अर्थ नाही.
पण आज काहीतरी बिघडल्याच जाणवलं. मी यशच्या घरी फोन केला. चौकशी केली. आई म्हणाली ” सर काय सांगू ? रोज उशिरा येतोय, अजिबात अभ्यास करत नाहीये. अभ्यास होतच नाही म्हणतो. परीक्षेत नापासच होईल बहुदा. काही विचारलं की संतापतो. जेवणा खाण्यात लक्ष नाही. काय करू मी? तुम्हाला माझी परिस्थिती माहितीय. गेल्यावर्षी मेरीटमध्ये आलेला हा मुलगा. नियमित अभ्यास करणारा. काय झालं हे अचानक?” दुस-या दिवशी भांडारकर रोडवर मुद्दामच यशला गाठलं. खांद्यावर हात ठेवला. म्हंटल, चल जरा गप्पा मारू. थोडासा वेळ देशील माझ्यासाठी ? त्याला हे अनपेक्षित होतं पण त्यालाही थोडसं मोकळं व्हायचं असावं. आला बरोबर. बी एम सी च्या ग्राउंड वर बसलो. त्याला म्हंटल ” तुझ्या आईनं कुठलीही तक्रार केली नाहीय. मलाच काल तुझी अस्वस्थता जाणवली. मदत करावीशी वाटली. आणि क्लिनिक पेक्षा इथं बोलायला छान वाटेल. हो की नाही? सांग बरं कसं चाललय तुझं ? अभ्यास..परीक्षा ! त्यानं हुंदके द्यायला सुरवात केली. म्हणाला,” खूप अस्वस्थ वाटतं हल्ली. अभ्यासात लक्ष लागत नाही. एकाग्रताच होत नाही. अभ्यासाला बसलं की दुसरेच विचार मनात येतात.आपल्या हातून काहीच घडणार नाही .. आपण अपयशीच रहाणार असे सारखे विचार येत रहातात मनात. झोप येत नाही. आयुष्यात अर्थ नाही असं वाटत. मरून जावस वाटत. सारखे लैंगिक विचार, घाणेरडे विचारसुद्धा मनात येत रहातात. मित्रांच्या नादानं कधी कधी बियर, सिगरेट पिण्याची सवय लागलीय. खरं तर मला हे आवडत नाहीय. पण शांतच वाटत नाही. बाबा नाहीत. आई एकटी सगळा गाडा ओढतेय. मी नापास झालो तर तीला काय वाटेल? मित्रमैत्रिणी हसतील. करियर कसं होईल. कलंक ठरीन. डाग लागेल कायमचा.”. माझ्या लक्षात आलं ही लक्षणं नैराश्याच्या आजाराची आहेत. यशला ह्यातून बाहेर काढायलाच हवं. त्याला म्हंटल, यश तुला किती त्रास होत असेल मी समजू शकतो. पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळा पर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्य आहे. तुझी समस्या एकाग्रतेची आहेच त्याचबरोबर एकूणच आयुष्यात आपल्याला नेमकं काय मिळालं तर आपण सुखी होऊ ह्याच्या उत्तराची आहे. दृष्टीकोन बदलाची आहे. यश तू ह्यातून निश्चित बाहेर येशील. मी तुला मदत करीन. भले ह्या वर्षी तुला मार्क्स कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी नापास होशील. पण हळू हळू पायरी पायरी पायरीने एकाग्रता व्हायला लागेल. आपली एकाग्रता कशामुळे गेलीय, ती कशी मिळवायची, आयुष्यात काय महत्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांना आनंद देत राहशील. पण उद्या पासून काही गोष्टी करायच्या. आपण ह्या परिस्थितीवर मात करू शकतो.” यशचे डोळे चमकले. त्याला सांगितलं उद्या पासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, आनंद कसा मिळवायचा आणि कसा टिकवायचा ,परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं व समस्येतून मार्ग कसा काढायचा, तणावाचा उगम/स्त्रोत कसा शोधायचा,सकारात्मक दृष्टीकोनाची जोपासना कशी करायची , आयुष्यातील प्राथमिकता कशी ठरवायची/कशी बदलायची, योजनाबद्ध पद्धतीने, पायरी पायरीने विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकायची अर्थात नकारात्मक पद्धत बदलायची. एकाग्रता साधण्यासाठीची तंत्रे शिकायची. यश म्हणाला, हे सगळं मला जमेल ? म्हंटल का नाही ? अनेकांना हे जमलंय. तणाव नियोजनाच्या विविध पद्धती (Eastern व Western) आपण शिकूया.
प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं रहावं, तसंच,तटस्थपणे स्वतःकडे व परिस्थितीकडे कसं पहावं हे शिकूया. काही ध्यानाच्या पद्धत्ती शिकूया,ज्या योगे चित्त शांत होईल.
आणि ह्या बरोबरच रोज भरपूर व्यायाम करुया ज्याने चांगली संप्रेरक शरीरात स्त्र्वतील. आपलं औदासिन्य कमी व्हायला मदत मिळेल. अभ्यासात एकाग्रता व्हायला लागेल. यश प्रथमच हसला. म्हणाला “सर खूप बर वाटलं तुमच्याशी बोलून. उद्या भेटूया आपण. सुरु करू.” “आणि बियर?” . मी विचारलं. “आजपासून संपलं सगळं सर. सगळं ठीक होणार असेल तर कशाला हवीय ती??. मी स्वस्थ झालो होतो , एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्यामुळे, फुलणा-या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.
विद्यार्थी आणि परीक्षेचा ताण
परीक्षेचा चांगला ताण अभ्यास करायला प्रवृत्त करतो परंतु अपरिमित ताण कदाचित सर्व भवितव्य विस्कटून टाकू शकतो. परीक्षेचा अतिरिक्त ताण येण्याची कारणे –
१. अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती
२. मेंदूतील रासायनिक असंतुलन
३. अपयश येणारच हे गृहीत धरणे व ते पचविण्याची तयारी नसणे.
४. नकारात्मक विचारसरणी व नकारात्मक स्व- संवाद
५. स्वत:कडून अवास्तव अपेक्षा
६. अभ्यासाची अपूर्ण तयारी
७. आयुष्यात अचानक घडणारे न टाळता येणारे महत्वाचे बदल (पालकांची बदली, त्याच्यातील घटस्फोट, आर्थिक संकट इ ).
८. प्रेमभंग
९. अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती
एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे.
अभ्यास करताना ज्ञानेन्द्रीयान्द्वारे माहिती स्वीकारली जाणे.ती मेंदूत साठवली जाणे. आणि आवश्यक तेंव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे. ह्या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात coordination असणे, फार महत्वाचे आहे.
अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: – ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे. मेंदूतील रासायनिक असंतुलन
मुळात मन स्वस्थ , स्थिर नसेल तर एकाग्रता साधणं शक्य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहित आहेत, त्यांची एक लिस्ट करावी. विश्वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ञ ह्यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ञांचे सहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder ) किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठी देखील वेळ न दवडता तज्ञांचे उपचार घ्यावेत.

न्यूनगंड आणि सोशल फोबिया – Published in Sunday Sakal

न्यूनगंड आणि सोशल फोबिया
डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ
मित्राच्या आग्रहावरून त्याच्या कंपनीत कार्यक्रमासाठी गेलो होतो. कंपनी नामांकित. presentations चालू होती. एकापाठोपाठ एक होता होता एका मुलाचे सादरीकरण सुरु झाले. जेमतेम काही सेकंद झाले असतील, त्या मुलाला बोलता येईना, दरदरून घाम फुटला होता. चक्कर येऊन पडतो कि काय इतपत स्थिती झाली. त्याने सादरीकरण थांबवले. आत गेला. मित्र म्हणाला “हा समीर आय आय टी पास आउट. लवकरच गुड बाय करावा लागेल ह्याला. नुसता मेरीटवाला असून उपयोग काय? आत्मविश्वास शून्य. इथेच नाही तर रोजच्या वागण्यात सुद्धा दबलेला. मीटिंग असो, असाइनमेंट असो. performance low .” मी म्हंटल ” मला भेटायचं ह्याला. मी मदत करू शकेन. एकदम काढू नका. ह्याचे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात.” मित्राच्या डोळ्यात अविश्वास. मी हसलो, म्हणालो “भेटायला सांग मला. त्याला असं का होतोय बघायला नको? त्याच्या करिअर चा प्रश्न आहे ” .
समीर येऊन भेटला. त्याच्याशी बोलताना जाणवलं, ह्याला लहानपणा पासून न्यूनगंड व सोशल फोबिया आहे. इतका हुशार मुलगा पण चारचौघात वावरताना, लोकांशी बोलताना दडपण येतं. स्वत:वरचा ताबा जातो. छातीत धडधडतं, खूप घाम येतो “सर, असं वाटतं आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे. काय ते कळत नाही. पण कॉलेज मध्ये असल्यापासून असं घडत गेलय. मनात इच्छा असूनदेखील खूप गोष्टी नाही करता आल्या. लोक आपल्याला हसतील, आपली चेष्टा करतील असं वाटत रहायचं. कुठंही कार्यक्रमाला गेलो, अनोळखी लोकं असोत नाहीतर ओळखीचे. एक प्रकारचं दडपण यायचं. आपण ह्यांच्यात मिसळू शकत नाही असं वाटायचं. कुणाचं तरी आपल्याकडे लक्ष जाईल. आपल्याला प्रश्न विचारला जाईल असं वाटायचं. शिक्षण पूर्ण झालं. नोकरीसाठी मुलाखती सुरु झाल्या. तिथेही तेच. प्रश्नांची उत्तर माहिती असायची पण आयत्यावेळी घाम फुटायचा, काही आठवायचंच नाही. आताही असं वाटतंय की मिळालेली ही नोकरीसुद्धा हातची जाईल. आपल्या हातून काहीतरी चूक घडेल आणि घरी जावं लागेल. ” तो रडू लागला. मी त्याला मोकळं होऊ दिलं. धीर दिला. तसा तो हळू हळू शांत झाला. म्हणालो ” समीर तुझ्यात काहीही कमी नाहीय. परिस्थिती नक्की बदलेल ह्यावर विश्वास ठेव. मी तुला मदत करीन. हा तुझा प्रश्न विशिष्ट प्रयत्नांनी सुटण्यासारखा आहे. आपण दोघं मिळून ह्यावर काम करू. ” त्याच्या चेहेऱ्यावर अविश्वास दिसत होता. पण डोळ्यात आशेची चमक सुद्धा. कारण त्याला ह्यातून बाहेर पडायचं होतं. आमची काही सेशन्स झाली. त्याची आत्मप्रतिमा खूप दुबळी होती. त्याच्या रंगाविषयी, उंची विषयी त्याला गंड होता. शाळेत, महाविद्यालयात, मुलांच्या चिडवण्यामधून तो आणखी पक्का झाला होता. लहानपणच्या दुबळ्या आर्थिक परिस्थितीमुळे, लोकांच्या टोमण्यान मुळे ही तो दुखावला गेला होता. आपल्याला बोलण्याची कला अवगत नाही. चार लोकात बोललो तर आपलं हसंच होईल हा समज घट्ट झाला होता. असे आणखी बरेच गंड त्याच्या मनात रुतून बसले होते. मी त्याला काही स्वस्थतेची सेशन्स दिली. काही मनाचे व्यायाम शिकवले. आणि काही महत्वाच्या टिप्स दिल्या. त्या अशा
१. ह्या जगात प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण आणि वैशिष्ठपूर्ण असते . तसाच तुही आहेस. प्रतिकूल परिस्थितून शिकून तू नोकरी मिळवली आहेस. तुझी बुद्धिमत्ता आणि कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत. तुझी सगळी बलस्थानं शोधून काढ.
२. ह्या जगात प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. वेगळी आहे. आपण सर्वं निसर्गनिर्मित आहोत. मग ती निर्मिती असुंदर कशी असू शकेल? रंग, उंची वगैरे परिमाणं मानवनिर्मित आहेत. त्यांच्याकडे फार लक्ष देण्यासारखं काही नाही. दिसण्यापेक्षा तुझं असणं म्हणजेच तुझी देहबोली, तुझं वागणं,तुझा वावर, आत्मविश्वास, बोलताना वापरली जाणारी सुसंस्कृत भाषा, चेहेऱ्यावरचं स्मित जास्त महत्वाचं आहे.
३. आपण जसे आहोत तसेच्या तसे स्वत:ला स्वीकारणं महत्वाचं आहे.
४. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता इत्यादी व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी विकसित करता येतात ह्यावर विश्वास ठेव. त्यासाठी स्वत:त बदल घडणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
५. माणसं आहेत तिथे मतभेद, संघर्ष, इर्षा, स्पर्धा, थोडंफार राजकारण असणारच. त्यानं मी अस्वस्थ होणार नाही. त्यासाठी कामाच्या ठिकाणी करायची स्वस्थतेची तंत्रे, स्वयंसूचना शिकून घेता येतात.
६. माझ्यासमोर असणारी लोकांची संख्या, त्यांची अधिकार पदामुळे असणारी श्रेणी ह्या गोष्टीचं दडपण माझ्यावर यायचं काहीच कारण नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ व महत्वाचा असतो. मीही माझ्या ठिकाणी महत्वाचा आहेच. माझ्या अंगी नम्रता असावी पण नेभळट पणा किंवा पळून जाण्याची वृत्ती नसावी. हे सगळं साधण्यासाठी, गर्दीची भीती घालवण्यासाठी कल्पना शक्ती वापरून करावयाच्या guided imagery च्या तंत्रांचा सरावही उपयुक्त आहे.
कुठेही काम करताना माझं सगळ्यांशी सौहार्दाचं, सलोख्याचं नातं असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तणावरहित असायला हवं. मी म्हणजे माझ्या आतला “मी ” स्वस्थ स्थिर, शांत, आनंदी असेन तरच माझं सहकारी , वरिष्ठ किंवा कनिष्ठान बरोबरचं नातं माझ्यासाठी सौहार्दाचं असू शकतं. मग माझा उत्साह, आत्मविश्वास, माझं कामातलं योगदान, आणि समाधान वगैरे सगळ्याच गोष्टी जमून येतात.
म्हणजेच मी स्वस्थ होत जाणं, माझी आंतरिक ताकद विकसित होत जाणं (Inward Journey) आणि माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली होत जाणं, कौशल्य विकसित होत जाणं (External Journey ) ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
आज ह्या गोष्टीला सात आठ महिने झाले. समीरमध्ये आमुलाग्र बदल झाला होता. त्यानंही मनापासून कष्ट घेतले आणि positive transformation घडू शकलं. आता दैनंदिन रुटीन मधल्या मिटींग्स, कस्टमर मिट पासून presentations पर्यंत सगळ्याच गोष्टी विलक्षण आत्मविश्वासाने तो करू लागला.
संध्याकाळी त्याच्याच कंपनीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्याचं सूत्रसंचालन समीर करतो आहे. मला खात्री आहे, ते तो उत्तमच करेल. मला प्रेक्षकात पाहिल्यावर आत्मविश्वासानं हात उंचावून स्मित करेल.

सोशल फोबिया (भिती) पुढील प्रसंगात जाणवू शकतो – १.नवीन व्यक्तींना भेटताना २. अधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तींशी बोलताना ३. विद्यार्थ्यांच्या बाबतीत, वर्गात उठून काही बोलायच्या वेळी ४. ऑफिस मध्ये सादरीकरण (presentation) करताना ५. सभेत किंवा मिटिंग मध्ये बोलताना ६. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होताना ७. सार्वजनिक स्वच्छता गृहे वापरताना ८. सार्वजनिक ठिकाणी जेवताना, खाता पिताना ९. स्टेजवरून बोलताना किंवा भाषण करताना १०. गर्दीच्या ठिकाणी वावरताना इ.

ह्या भितीमधील भावनात्मक लक्षणे – १. दैनंदिन जीवनात सततची अस्वस्थता व self – conciousness २. ठरलेल्या कार्यक्रमा आधी किंवा घटने आधी आठवडेच्या आठवडे किंवा कित्येक दिवस आधी भिती वाटायला सुरवात होणे ३. आपल्याकडे कुणीतरी सारखे बघतय, लक्ष ठेवून आहे, जज करतय अशी भिती वाटत रहाणे ४. आपण चुकीचेच वागू असा सारखे वाटत रहाणे ५. आपण नर्वस झालो आहोत हे इतरांच्या लक्षात येईल ह्याची भिती वाटणे
ह्या भिती मधील शारीरिक लक्षणे – १. चेहरा मलूल दिसणे २. श्वासोत्त्छ्वास जोरात होणे ३. पोटात खड्डा पडणे ४. हात कापणे, आवाज कापणे ५. छातीत धडधडणे किंवा जड वाटू लागणे ६. तळव्यांना घाम येणे ७. चक्कर येणे
ह्या भिती मधील वागणुकीतील बदल किंवा लक्षणे – १. समारंभांना किंवा गर्दी होणार असेल अशा ठिकाणी जाणे टाळू लागणे २. अशा ठिकाणी जावेच लागले तर कुणी बघणार नाही अशा जागी थांबण्याचा प्रयत्न करणे किंवा लवकरात लवकर कुणाच्याही नकळत निघून जाण्याचा प्रयत्न करणे

अर्थार्जनाचं ठिकाण, एक कटुंब – तेथील मानसिक स्वस्थता व आनंद Published in Saptahik Sakal Special Issue

अर्थार्जनाचं ठिकाण, एक कटुंब – तेथील मानसिक स्वस्थता व आनंद
डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ / ताणतणाव व्यवस्थापन तज्ञ
www.vidyadharbapat.in M – 9850415170
कुठलीही व्यक्ती आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठी जगत असते. ह्या गोष्टी मिळवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकेल . ह्या शब्दांची व्याख्या वेगवेगळी असू शकेल परंतु जन्म व मृत्यू दरम्यानचा, माझा पृथ्वी ह्या ग्रहावरचा प्रवास स्वस्थ आणि सुखावह कसा होईल ह्यासाठी सगळा अट्टाहास असतो. मग मी स्वस्थ असणं, माझं कुटुंब स्वस्थ असणं , मी जिथे अर्थार्जनासाठी काम करतो तिथे स्वास्थ्य असणं हे महत्वाचं ठरतं. किंबहुना मी जिथे काम करतो ती कंपनी असो, सरकारी कार्यालय असो किंवा कुठलीही संस्था. मी म्हणजे माझ्या आतला “मी ” स्वस्थ स्थिर, शांत, आनंदी असेन तरच माझं सहकारी , वरिष्ठ किंवा कनिष्ठान बरोबरचं नातं माझ्यासाठी सौहार्दाचं असू शकतं. मग माझा उत्साह, आत्मविश्वास, माझं कामातलं योगदान, आणि समाधान वगैरे सगळ्याच गोष्टी जमून येतात. आता “मी” स्वस्थ होणं, असणं हे माझ्या संस्थेतल्या वर पासून खालपर्यंत प्रत्येकाचीच गरज ठरते. म्हणूनच हा “मी” तणावरहित, स्वस्थ आणि म्हणूनच अधिक कार्यक्षम कसा होईल, त्याच बरोबर माझा एकूण जीवनाकडे, समस्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा असावा हे मुद्दे महत्वाचे ठरतात.
“मनाचं स्वास्थ्य” ही गोष्ट व्यक्ती, कुटुंब, माझं अर्थार्जनाचं ठिकाण(कंपनी, संस्था इ.) आणि एकूणच समाज ह्या सगळ्यांच्या अवकाशात महत्वाची ठरते. कारण त्यावर व्यक्ती व्यक्तींमधील नात्यातील (interpersonal relations) harmony ठरते. वातावरणातील सहजता, मोकळेपणा ठरतो. प्रथम आपण, व्यक्ती म्हणून प्रत्येकजण तणावरहित का आणि कसं व्हायचं हे पाहू. ताणतणावाचं नियोजन आणि अस्वस्थतेचचं निर्मुलन ही पहिली पायरी ठरते.
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत,भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण शेवटी तणावांमुळे शरीरात होणा-या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. त्याच बरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine ह्या neurotransmitters मध्ये असंतुलन निर्माण होतं. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळतं . ह्याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणं दिसायला लागतात, ज्याची नोंद वेळेवर घेणं जरूर असतं.
आज कॉरपोरेट, मिडिया आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचे नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय.
बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांवर अपरिमित ताण तणाव असतात. ह्या ताणाचे स्त्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जागरणे, सततची जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणे हे प्रश्न असतात. ह्या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या cadre मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. ह्या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्चितपणे होतात. वेळीच जर ह्यावर उपाय झाले नाहीत तर वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार होण्यात त्याची परिणीती होते. सततच्या अस्वस्थतेमुळे वाटणारी सुरवातीची, शारीरिक व मानसिक लक्षणे पुढील प्रमाणे असतात. सतत अस्वस्थ वाटत रहाणे, लहान सहान कारणांवरून होणारी चिडचिड. राग अनावर होणे, झोप न येणे किंवा जास्ती येणे, अनामिक भीती वाटत रहाणे, भूक न लागणे किंवा अतिभूक लागणे, विनाकारण संशय येणे, एकाग्रता न होणे, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणे, विलक्षण थकवा वाटणे, वारंवार पोट बिघडणे, निराश वाटत राहणे, आत्मविश्वास कमी होणे, जगण्यातील आनंद कमी होणे, इत्यादी.
ह्या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडीत संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्त्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या metabolism वर विपरीत परिणाम होतो. त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचन संस्थे संबंधातले विकार व अनेक आजार उदभवू शकतात. Neuroimmunology ह्या शास्त्र शाखे च्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजारांचं मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताण तणावात असतं.
तसेच ह्या सर्वं लक्षणांची परिणीती कार्यक्षमता कमी होणं, व्यसनाधीनता वाढणं, कामावरची गैरहजेरी वाढणं इत्यादी गोष्टींमध्ये होते.
ह्या ताणतणावाचे नियोजन कसं करायचं , एक कणखर परंतु शांत, स्वस्थ मन:स्थिती निर्माण करता येईल का? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी पुढील पायऱ्यांमध्ये काम करावं लागेल. आवश्यक वाटल्यास तज्ञांची मदत घ्यावी लागेल.
१. ताण समजून घेणं व त्यांची नोंद करणं – आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत रहाते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटतं ? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे , अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडीट असेल.तज्ञांच्या सहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ञांशी बोलल्या मुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.
२. उपाय योजना व आवश्यक असल्यास औषधोपचार, थेरपीज – एकदा तणावाचे मूळ तसेच अस्वस्थतेच्या आजाराचे स्वरूप लक्षात आले की आवश्यक असल्यास तज्ञांनी सुचवलेली औषधे घेणे आणि आवश्यक त्या सायकोथेरपी, समुपदेशन , तणाव नियंत्रणाची, मन:स्वास्थ्याची तंत्रे शिकणे व ह्या सर्वांचा विशिष्ठ कालावधी पर्यंत उपयोग करणे महत्वाचे आहे.
३. व्यायाम, योगासने, प्राणायाम , ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे – रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे ज्यायोगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (त्याचा formula – २२० वजा आपले वय. उत्तराच्या दोन तृतीयांश एवढी मिनिटाला वाढवणे. . म्हणजे उदा. वय चाळीस असेल तर २२० – ४० = १८० च्या २/३ म्हणजे १२०. नाडीची गती मिनिटाला १२० पर्यंत वाढवणे, व ती वीस मिनिटे टिकवणे. ) म्हणजे तेवढ्या वेगात चालणे, धावणे, पोहोणे इत्यादी. ह्यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक anti depressants स्त्रवतील . तसेच प्राणायाम ,ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान , क्षणसाक्षीत्वाची (mindfulness ), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घेणे.
४. संगीत, कविता, छंद आणि मैत्र – संगीत हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे , कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे ह्याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे ह्याचा छान उपयोग होतो.
५. सकारात्मक दृष्टीकोन व विचार – परिस्थिती कधीच एकसारखी रहात नाही. ती बदलेलच ह्यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच हा विश्स्वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वत:ला स्वस्थ करून स्वयं सूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे.
६. Creative visualization तंत्रे व गायडेड इमेजरी – मानवाला बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती ह्या खूप महत्वाच्या देणग्या मिळालेल्या आहेत. पाचही ज्ञानेंद्रिये वापरून बुद्धिमता आणि कल्पनाशक्तीच्या सहाय्याने creative visualization व गायडेड इमेजरी च्या सहाय्याने सकारात्मक व आनंदमय अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुरवातीला तज्ञांच्या सहाय्याने script निर्माण करून करावे लागते. ताणतणावाच्या निराकरणासाठी ह्या तंत्रांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.
७. चौरस व पौष्टिक आहार – ड्युटीच्या अनियमित वेळा लक्षात घेऊन सुद्धा जीवनसत्वयुक्त, प्रथिनेयुक्त, आहार, दुध व दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
८. दृष्टीकोन आयुष्याकडे पाहण्याचा -
मन:स्वास्थ्य कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का ? ह्याचं उत्तर निश्चित होकारार्थी आहे. त्या साठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत. आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवं.
जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया,
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया,
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया !
ह्या प्रार्थनेतील मर्म समजून घेतलं तर बरेच प्रश्न सुटतील. “मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय?” हे केंव्हा उमजेल, जर आपण आतून स्वस्थ झालो तर. स्वस्थ झाल्यावर आपण परिस्थितीचं नीट अवलोकन करू शकू आणि मार्ग काढू शकू की जो प्राप्त परिस्थितीत आणि पुढील आयुष्यात आपल्याला उपयोगी पडू शकेल.
सर्वांच्याच संदर्भात आपलं “आतलं ” जग शांत राहिलं तरच “बाह्य” जगासाठी आवश्यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव मग ते व्यक्तिगत असोत किंवा नोकरीतले असोत ते सहन करण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. मानसिक ताकद वाढेल.
“आतलं” जग शांत करण्यासाठी रोज काही वेळ “स्व” कडे पाहण्याची सवय व्हायला हवी.
श्वासावर आधारित स्वस्थता -
आपला श्वास ही एक गोष्ट वर्तमान क्षणात असते. आणि मन:शांती वर्तमान क्षणात रहाण्याच्या सवयीतून मिळू शकते. श्वासावर लक्ष ठेऊन आपण शांत राहण्याचा सराव करू शकतो.
शांत बसून, डोळे मिटून, स्वत:चा श्वास पाहायला सुरवात करावी . श्वास मुद्दाम सोडू नये, घेऊ नये. नैसर्गिकपणे ज्या लयीत तो येतोय ती लय असू द्यावी. त्यानंतर क्रमाक्रमाने, ऐकणे (कान), पहाणे (डोळे), वास (नाक), चव (जीभ, रसना) आणि स्पर्श ह्या पाचही ज्ञानेन्द्रीयाचं काम, आणि एकूणच शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या संवेदना साक्षी भावाने पहाव्यात. चांगलं, वाईट ठरवू नये. पुन्हा शांतपणे श्वास पाहायला सुरवात करावी. त्या दरम्यान विचार आले तर येतील आणि जातील ही धारणा ठेवावी. विचारांना विरोध करू नये. विरोध केला की ते झुंडीने यायला सुरवात होईल. विचार कुठलाही असो, भूतकाळातला किंवा भविष्यकाळातला, शुभ किंवा अशूभ, आनंदाचा वा दु:खाचा, त्याला फक्त “विचार” असं लेबल लावून , महत्व न देता सोडून द्यावा. पुन्हा श्वास पहात राहावा. विचारात गुंतत जाऊ नये. पण मन चंचल आहे. त्यामुळे सुरवातीला आपण विचारात वहात जाण्याची शक्यता असते. हरकत नाही. ज्या क्षणी भान येईल त्याक्षणी स्व:त वर न चिडता शांतपणे पुन्हा श्वास पाहायला सुरवात करावी.श्वासामध्ये बुडून जावं. हळू हळू विचार कमी होत जातात. दोन विचारांमधलं अंतर वाढत जातं . आपण शांत होऊ लागतो. हा सवयीचा, साधनेचा भाग आहे. नियमित सरावाने आपण शांत व्हायला मदत होते. तसेच हळूहळू सर्व घटनांकडे साक्षी भावाने, त्रयस्थ पद्धतीने पहाण्याची क्षमता वाढते. मग आपणच परिस्थितीचा, स्वत:च्या व इतरांच्या वर्तणुकीचा त्रयस्थ नजरेतून विचार करू शकतो. योग्य निर्णय कमीत कमी वेळात घेऊ शकतो. ताणतणावांवर मात करण्याची क्षमता विकसित करू शकतो.
ह्या क्रिया आपण जेंव्हा मनापासून करतो त्यावेळी त्याचा मनासाठी व शरीरासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. नाडीचे ठोके पूर्ववत होतात. रक्तदाब ठीक होतो. पचनसंस्था व एकूणच प्रतिकारशक्ती वाढते. हृदयावरचा ताण हलका होतो. रक्ताभिसरण व एकूणच शरीराच्या चयापचयावर चांगला परिणाम होतो. मुख्य म्हणजे मन स्वस्थ होते. मानसिक ताकद वाढते. त्याने प्रतिकूल परीस्थित आपण शांत राहू शकतो. सहनशक्ती वाढते.
वरील क्रियांबरोबरच मनामध्ये सकारात्मक कल्पनाचित्रे आणणे. त्यात काही काळ एकरूप होऊन जाणे ह्याने मनाची ताकद वाढते उदा. पूर्वीचे आनंदाचे क्षण आठवणे. आपले यशाचे क्षण आठवणे मग ते यश अगदी छोटे घरगुती गोष्टीतले असो वा नोकरीतील असो. अशा चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडू शकतात ही सकारात्मक सूचना स्वत:ला देत रहाणे हे ही मनाला उभारी देते. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. बाहेरचं वातावरण, परिस्थिती आपण बदलू नाही शकत पण आपली प्रतिक्रिया बदलू शकतो तसेच मानसिक दृष्ट्या स्वत:ला कणखर बनवू शकतो.
अस्वस्थतेची मानसिक लक्षणे – १. Lack of Confidence & Concentration आत्मविश्वास कमी होणे, कामात व एकूणच एकाग्रता न होऊ शकणे २. Memory Lapses लक्षात न रहाणे, स्मृतीसंदर्भात अडचणी. ३.Difficulty in making decisions निर्णय क्षमता कमी होणे ४. Confusion लहानसहान गोष्टीत गोंधळ उडणे , ५. Disorientation विचार करताना मूळ मुद्दा सोडून भरकटायला होणे. ६. Panic Attacks छातीत धडधड, अचानक घाम फुटणे, काल्पनिक भीती वाटायला लागणे वगैरे ७. उताविळपणा वाढणे, ८. अचानक रडू येणे, ९. लहानसहान कारणांवरून अति राग येणे १०. आत्मविश्वास डळमळीत होणे
अस्वस्थतेची शारीरिक लक्षणे – १. Sleep Disorders झोपेचे प्रश्न – अजिबात झोप न येणे किंवा जास्त झोप येणे २. Digestion problems पचनाच्या तक्रारी ३. Headache डोकेदुखी ४. Skin disorders त्वचेचे प्रॉब्लेम्स ५. अचानक थकवा येणे ६. Blood Pressure रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे ७.Sexual problems लैंगिक तक्रारी, इच्छा, क्षमता कमी होणे ८. Psychosomatic diseases इतर अनेक मनोकायिक आजार
आपण “आतून” स्वस्थ होत असतानाच कंपनी/संस्थेतील सहकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध चांगले (cordial ) राहण्यासाठी पुढील मुद्दे महत्वाचे आहेत.
१. एकमेकांशी संवाद साधताना “अहंकार” आड येऊ नये ह्याची काळजी २. दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण इथे व्यतीत करतो आहोत, त्यामुळे सर्व एका कुटुंबातले सदस्य आहेत ही भावना ३. आपण चुकू शकतो तसेच आपल्या सहकाऱ्यांकडूनही चूक होऊ शकते ह्याची जाणीव. ४. दुसऱ्याला मदत करण्याची तयारी ५. सहकाऱ्यांवर दोषारोप व गॉसिपिंग टाळणे ६. प्रामाणिकपणा ७. सहकाऱ्यांशी तुलना करणे टाळणे, मत्सर करणे निश्चित घातक आहे ८.कमीटमेंटस पाळणे ९. अचीवमेंनट्स चे श्रेय वाटून घेणे ९. कामाच्या ठिकाणी आल्याबरोबर वैयक्तिक व घरगुती ताण बाजूला ठेवणे. त्यासाठी compartmentalization ची तंत्रे शिकून घेणे १०. सकारात्मक mindset ठेवणे, उत्साही आनंदी वातावरण राखण्याचा प्रयत्न करणे.
ह्या सगळ्या गोष्टी आदर्शवत वाटल्या तरी प्रत्येकाने प्रयत्न केल्यास ते शक्य आहे आणि त्याचा लाभ सगळ्यानांच होणार आहे. तीव्र स्पर्धा, पुढे जाण्याची अहमहिका, नोकरीची असुरक्षिता, काही ठिकाणी व्यवस्थापनाची न पटणारी धोरणे, प्रोत्साहन नसणे अशा नकारात्मक परिस्थितीत सुद्धा स्वतःची स्वस्थता आणि प्रगती साधायची असेल तर वरील गोष्टी उपयुक्तच ठरतात. आयुष्य मर्यादित आहे. त्यातला प्रत्येक क्षण मला आनंदात घालवायचा आहे हे महत्वाचे.
व्यवस्थापनाची भूमिका व सौहार्द –
कंपनीतील/संस्थेतील सकारात्मक, तणाव रहित वातावरण कंपनीच्या प्रगतीसाठी, विकासासाठी हातभारच लावणार आहे हे व्यवस्थापनानं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी व्यक्तीच्या मानसिक व भावनिक गरजा लक्षात घ्यायला हव्यात. त्या अशा –
१. Being Accepted – मला स्वीकारलं जातंय
२. Being Believed in – माझ्यावर विश्वास ठेवला जातोय.
३. Being Cared about – माझी काळजी घेतली जातेय
४. Being Forgiven – माझ्या हातून नकळत घडलेल्या चुकांबद्दल मला माफ केलं जातंय (अति सौम्य व नियमात बसतील अशा)
५. Being Loved – मला स्नेह मिळतोय
६. Being Safe – मी इथे सुरक्षीत आहे
७. Being Supported – मला योग्य तेंव्हा पाठिबा मिळतोय
८. Being Trusted -माझ्यावर विश्वास ठेवला जातोय
९. Being Understood- मला समजून घेतलं जातंय
१०. Being Valued – मला इथं किमत दिली जातीय. माझ्या योगदानाची जाणीव ठेवली जातेय.
वरील गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापनानं धोरण ठरवलं पाहिजे. कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच्या HR training व्यतिरिक्त व्यक्तिमत्व व मानसिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखायला हव्यात. प्रोत्साहना साठी व स्वस्थतेसाठी वेळोवेळी तज्ञांची स्वस्थतेची तंत्रे शिकवणारी शिबिरं, कुटुंबियांसाठी वेगवेगळ्या स्वास्थ्य योजना आयोजित करायला हव्यात .
व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संवाद पद्धती, त्यांचे “इगो” कंपनीतील वातावरणावर अनिष्ट परिणाम करीत नाहीत ना ह्याची जाणीव ठेवायला हवी. खरं तर हे सर्वच स्तरातील व्यक्तींना लागू आहे.
प्रत्यक्ष कामाच्या जागेवर स्वस्थता व कार्यक्षमतेत वाढ करणारी तंत्रे -
कामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी, जागेवरच करण्याची काही स्वस्थतेची तंत्रे आहेत. Visualization Techniques आहेत. त्यानं मन शांत होतंच शिवाय एकाग्रता, focusing, निर्णय क्षमता improve होते. आतून उत्साह वाटू लागतो. ही तंत्रे तज्ञांकडून शिकून घ्यावीत.
सुप्रसिद्ध व्यवस्थापकीय सल्लागार Betty Bender ने म्हंटल्या प्रमाणे “When people go to work, they shouldn’t have to leave their hearts at home.”
थोडक्यात, आयुष्यातला जास्तीत जास्त काळ आपण कामाच्या ठिकाणी व्यतीत करतो. आपल्यासाठी ते एक कुटुंबच आहे. तिथलं वातावरण छान असणं आणि त्या वातावरणातले “आपण” छान असणं, महत्वाचं !
www.vidyadharbapat.in

घटस्फोटाच्या प्रक्रिये दरम्यान स्त्रियांपुढील मानसिक आव्हाने/ ताण तणाव – डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ – Article Published in Sunday Sakal

घटस्फोटाच्या प्रक्रिये दरम्यान स्त्रियांपुढील मानसिक आव्हाने/ ताण तणाव -
डॉ. विद्याधर बापट – मानसोपचार तज्ञ
सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे आलेली अस्वस्थ सुलेखा आणि आज परिस्थिती तशीच असूनही स्वस्थ, स्थिर चित्ताने, हसतमुखाने पदोन्नतीचे पेढे देणारी सुलेखा, दोन्हीत केवढं अंतर. केवढी आंतरिक स्थिरता तिनं मिळवली होती.
परिस्थिती सोपी नव्हती. सहा वर्षांचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर. घटस्फोटासाठी अर्ज दाखल. पदरी चार वर्षाची मुलगी. नोकरी गेलेली. नवीन करण्याची उमेद खचलेली. नवऱ्याच्या स्वभावामुळे आणि अवास्तव अटींमुळे तडजोडीची शक्यता मावळलेली. नवरा कसलीही आर्थिक मदत द्यायला तयार नाही. तिचे सर्वच हक्क नाकारलेले. उलट जा तुला काय करायचं ते कर ही अरेरावी. आता कोर्ट दरबारी जे काय होईल त्याची वाट पहायची. सुलेखानं खूप सहन केलं होतं. तडजोडीचा प्रत्येक प्रयत्न करून पाहिला. मुलीसाठीतरी हा मार्ग नको असं वाटत होतं . पण अखेर जगणंच असह्य झाल्यावर तीला दुसरा पर्याय उरला नाही. अहंकार आणि संशय शेवटी जिंकले.
तीव्र नैराश्यानं ग्रासलेल्या, उमेद खचलेल्या एका असहाय्य स्त्रीला पुन्हा उभं करायचं होतं. तिला धीर दिला. आव्हानं होती परिस्थिती विनाअट स्वीकारणं. हिमतीनं सामोरं जाणं. पुन्हा नव्यानं आयुष्य उभं करणं. आर्थिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या सक्षम होणं. चूक नसताना निर्माण झालेला अपराधगंड आणि न्यूनगंड काढून टाकणं.
आमची सेशन्स चालू झाली. तिला स्वस्थतेचे काही व्यायाम. ध्यानाच्या पद्धती शिकवल्या. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने कसं पाहायचं, मनात येणारे नैराश्याचे विचार किंबहुना विचारांचे लोंढे कसे थांबवायचे ह्याची तंत्र शिकवली. प्रत्येक व्यक्तीत भावनिक ताकद असते. बौद्धिक क्षमता असतात त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवलं. काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या, ज्या घटस्फोटाच्या तणावयुक्त व अप्रिय प्रक्रियेतून जाव्या लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त आहेत. उदा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला विशिष्ट वेळ लागणारच. त्यासाठी मनाची तयारी करायला हवी. भावनांचा त्रास होणारच. पण तो किती प्रमाणात करून घ्यायचा हे आपण ठरवू शकतो. आपल्या आंतरिक शांततेला धक्का लागणार नाही ह्यासाठीची तंत्रे आपण शिकू शकतो. आपल्या बाबतीत वाईट घडले म्हणजे सगळे जगच वाईट आहे अशी टोकाची भूमिका घेऊ नये. परिस्थिती बदलत असते. आपल्याही आयुष्यात पुढे निश्चित चांगले घडेल ह्यावर विश्वास ठेवावा.
नवऱ्याच्या धमकावण्याना घाबरू नये. घटनेने स्त्रीच्या संरक्षणासाठी संपूर्ण तरतूद केलेली आहे हे लक्षात ठेवावे. त्याचबरोबर व्यक्ती बदलू शकतात ह्यावर विश्वास ठेवावा. त्याच्याकडून तडजोडीसाठी स्वीकारण्यासारखा तोडगा आला. त्यात प्रामाणिकपणा असेल तर विचारपूर्वक पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग असतोच. त्यावेळी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवावा. परंतु कुठल्याही परिस्थितीत आत्मसन्मान ,आदर आणि हक्क ह्यांना ठेच पोहोचत नाही ह्याची खात्री करावी. एकत्र येणे शक्यच नसेल आणि सर्व बाजूने विचार करून जर बाजूला होण्याचा पर्याय स्वीकारावा लागत असेल तर आपल्या आणि मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने बाजूला होणेच योग्य आहे हे मनाला सांगावे. मनाची तयारी करावी व केस निकालात निघेपर्यंत व नंतर आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी. सामाजिक दबावाचा, नातेवाईक, मैत्रिणी काय म्हणतील ह्याचा ताण घेऊ नये. हा कटू निर्णय अंतिमत: आपल्या व मुलांच्या हितासाठी घेतला आहे. कुणालाही कुठलंही स्पष्टीकरण देण्यास आपण बांधील नाही. हा मधला कालखंड अतिशय तणावाचा असू शकतो. त्याकाळात तोल जाऊ शकतो व नको ते शब्द उच्चारले जाऊ शकतात किंवा कृती घडू शकते. त्याने परिस्थिती बिघडू शकते ह्याचे भान ठेवावे.
स्वत:ला शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ ठेवण्यासाठी रोज भरपूर चल पद्धतीचा (वेगात चालणे, जॉगिंग, पोहोणे इ.)व्यायाम करावा. त्याने मेंदूत serotonin व इतर नैराश्य प्रतिबंधक स्त्राव स्त्रवतील. तुम्हाला उत्साही राहायला मदत मिळेल. ध्यान, स्वस्थतेची तंत्रे ह्याने मन स्थिर रहायला मदत होईल. अंतर मनाचं सामर्थ्य अफाट असतं. आपण स्वत:ला कणखर बनवू शकतो. सकारात्मक स्वयंसूचनेचे तंत्र शिकून घ्यावे. creative visualization ची तंत्रे शिकून घ्यावीत. त्याचा खूप उपयोग होतो. दिवसभर मधून मधून श्वास पहात राहावा. शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना त्रयस्थपणे न्याहाळायला शिकावे. ह्या सर्व गोष्टींमुळे स्वस्थ होणं, साक्षीभावाने परिस्थिती न्याहाळणे आणि विना अट तिचा स्वीकार करणे किंवा आवश्यक ती कृती करणे शक्य होते. विरुद्ध बाजूकडून (पती वा पत्नी) काहीही बोललं गेलं किंवा कृती झाली तरी आपण ताबा न ढळू देता विचारपूर्वक उत्तर द्यायचय किंवा कृती करायचीय हे लक्षात ठेवावे.
आपण ठाम असणं आवश्यक असलं तरीही न रागावणं किंवा भावनेच्या आधीन न जाणं महत्वाचे आहे. ह्या कठीण काळात आपण आपल्या भावना, अस्वस्थता, योग्य व्यक्तीपाशी, तज्ञापाशीच व्यक्त करणे आवश्यक आहे. तज्ञ आपल्याला सकारात्मक पद्धतीनं मोकळं व्हायला मदत करू शकतात. योग्य रीतीने भावना हाताळण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात.
सुलेखाने हे सर्व शिकून घेतलं. होणारा घटस्फोट हा आयुष्याचा अपरिहार्य टप्पा म्हणून स्वीकारला. आयुष्य अनित्य आहे आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत ह्याचा स्वीकार केला. स्वत:तील क्षमतांचा पुरेपूर वापर केला. नवीन नोकरी स्वीकारली आणि तिच्या कौशल्यांमुळे तीला आज प्रमोशनही मिळाले. पाणी वाहतं राहिलं. आता घटस्फोटाच्या केसचा निकाल लवकरच लागेल. तो काहीही असो पण कठीण परिस्थितीत कणखर रहाता येतं, स्वत:त positive transformation घडवून आणता येतं, हे तिनं दाखवून दिलंय.

व्हिडीओ गेम्सचं व्यसन आणि मुलं – Published in Sunday Sakal

व्हिडीओ गेम्सचं व्यसन आणि मुलं
– डॉ विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ

तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणूकाही जीवन मरणाचा प्रश्न होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतीदायक गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद ,कधी विलक्षण हताश. त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितकं लांब पळता येईल तेवढं पळायचं होतं.

व्हिडीओ / कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला. अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लास मधलं लक्ष उडालेला. शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारा. पण आता आईवडिलांनी कितीही समजावलं तरी, रागवलं तरीही गेम्स खेळणं थांबवू न शकणारा. गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेला. जे विश्व त्याला खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. ज्या विश्वात भयानक वेग, गती, उत्सुकता, हिंसा, जिंकत जाण्याचा फील आहे. त्याला एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे पण त्यातली नशा त्याला पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते.

आणि प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय? अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीयं, मन:शांती हरवलीय, विलक्षण एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याच गणित बिघडून गेलंय. मेरीटमध्ये येण्याची शक्यता असलेला मुलगा नापास होतोय. आईवडील अस्वस्थ झालेत. काय करावं त्यांना सुचत नाहीय.
असे अनेक समर अवतीभवती आहेत. व्यसनात अडकलेले. मी समरच्या आईबाबांशी त्याच्या बालपणाविषयी बोललो. समरशी बोललो. अनेक सेशन्स झाली. त्याची भावनिक जडणघडण, व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं तो introvert, लाजाळू , अबोल आहे. त्याच्यात विलक्षण न्यूनगंड आहे. बाहेरच्या परिस्थितील आव्हानं पेलण्याची त्याची तयारी नाही. मग कृत्रिम वास्तवात म्हणजे गेम्समध्ये जगात भारी ठरता येतंय ह्याचं सुख त्याला वारंवार हवंय. पण त्याच वेळेला आपण आपला अभ्यासाचा महत्वाचा वेळ वाया घालवतोय हा अपराधगंड आहेच. पण तो हतबल झालाय. गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीय. एन्जॉयमेंट म्हणून तो आता खेळू शकत नाहीय. ते compulsion बनलंय.
हीच गोष्ट अनेकांची झालीय. अजय, आशुतोष, पियुष, यश आणि अनेक. त्यातले बरेच शाळेला, कॉलेजला, क्लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडे लक्ष नाही. काळावेळाचं भान नाही. घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. नजर चुकवतात. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. काही विचारलं तर चिडतात. दुरुत्तर करतात. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इन्टरनेट काढून टाकलं तर मोबाईल नाहीतर सायबर क्याफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काहीजणांना पट्कन व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय. सायबर क्याफे जणू दुसरं घर झालंय.
ह्या व्यसनात इतर व्यसनान प्रमाणेच जैविक कारणंही आहेत. खेळत असताना, वाढणारी मेंदूतील endorphin, आणि इतर द्रव्ये एक सुखाचा, धुंदीचा फील देत राहतात . मग उन्माद वाटायला लागतो. त्याची सवय लागली की खेळत नसतानाही त्याच्या स्मृती सुखावत राहतात. मग मेंदूत सतत ती नशेची धून राहतेच.
ह्या सर्व मुलांना वाचवायला हवं. त्यांना वास्तवात जगायची हिम्मत द्यायला हवी. त्यांच्यावरचे ताणतणाव समजून घायला हवेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना मिळवून द्यायला हवी. त्यांची मूल्य दुरुस्त करायला हवी. बाहेरचं जग खरं जग आहे. त्यातले आनंद, जय, पराजय, आव्हानं स्विकारण्यातली गंमत त्यांना समजून द्यायला हवी. काही काळ मग काही कटू निर्णय घ्यावे लागतील. गेम्सपासून त्यांना तोडावं लागेल. पण हे सगळं हळुवारपणे, त्यांना विश्वास देत देत करावं लागेल. काही थेरपीज वापरायला लागतील. समुपदेशन लागेल. आंतरिक शांततेच्या स्त्रोतांची, त्यांच्याशी भेट घडवून आणावी लागेल. मग परिस्थिती बदलेल. निश्चित बदलेल.
समरच्या बाबतीत आता परिस्थिती सुधारतीय. त्याचे आईवडील, शिक्षक, तो आणि मी सगळ्यांनी मिळून team म्हणून काम केलं. व्हिडीओ गेम चा थोडा वेळ आनंद घेणं आणि व्यसनाधीन होऊन जाणं ह्यातला फरक त्याच्या लक्षात आलाय. ह्या पुनर्वसनाच्या निमित्ताने एक चांगली गोष्ट घडली. त्याच्या व्यक्तिमत्वामधले दोष, कमतरता लक्षात आल्या. त्यावर मात करून त्याला स्वत:ला आतून शांत आणि कणखर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु झाले.
व्हिडीओ गेम्सच्या अजगराचा विळखा जगभर वेगात पसरतो आहे. बहुतांशी, न्यूनगंड असलेली, अंतर्मुख असलेली, सोशल नसलेली, मनाने दुर्बल असलेली मुलं ह्या व्यसनात अडकताना दिसतायत. आपण सावध रहायला हवं.