Fear in childhood

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
मोठेपणी मन कणखर त्याचवेळी भावनिक दृष्ट्या समतोल व्हायला हवं असेल तर लहानपणापासूनच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. लहानपणी मनात रुजलेली भीती, न्यूनगंड इत्यादी व्यक्तिमत्व विकासाच्या आड येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींकडे वेळेवर लक्ष देणं महत्वाचं ठरतं. लहानपणी बहुतेक सर्वांनाच कसली ना कसली भीती वाटलेली असते. कधी अंधाराची, कधी गोष्टीतल्या किंवा टी. व्ही. सिरियल मधल्या भूताची. पण कालांतराने त्या भितीतला फोलपणा जाणवायला लागतो आणि ती नाहीशीही होते. पण अतिसंवेदानाशील अशा ब-याच लहान मुलांच्या बाबतीत हे सहजासहजी घडत नाही. इतरही काही कारणांमुळे निर्माण झालेली भीती,असुरक्षितता आत खोल रुजून राहिलेली आढळते. ही असुरक्षितता नंतर तीचं स्वरूप बदलते. मोठेपणी व्यक्तिमत्वाची, स्वभावाची वीण बनताना तीचा अविभाज्य भाग बनू शकते.
लहानपणी वयानुसार वाटणारी स्वाभाविक भीती म्हणजे-अगदी लहान बाळांना अनोळखी त्रयस्थ व्यक्तीची वाटणारी भीती, दहा महिने ते दीड वर्षं ह्या वयात आई किंवा वडील आपल्या पासून दूर होताना, जाताना बाळाचं अस्वस्थ होणं, वय वर्षे चार ते सहा दरम्यान वाटणारी गोष्टीतल्या भूतांची, राक्षसांची भीती तसेच अंधाराची भीती, साधारण सात ते दहा ह्या वयात आजूबाजूच्या घडणाऱ्या वास्तव प्रसंग, उदा. मृत्यू, अपघात, घातपात व दहशतवादाच्या बातम्या, चित्रे, दृश्य ह्यांची भीती. ह्या सगळ्या भीती कालांतराने नाहीशा होणं गरजेचं असतं.
पण काही अति संवेदनाशील मुलांच्या बाबतीत काही भीती वा अस्वस्थता व्यक्तिमत्वातील असुरक्षिततेचं कारण ठरू शकतात. उदा. शाळेत वर्गात इतर मुलांकडून झालेली टिंगल, शिक्षकांनी चूक नसताना केलेली हेटाळणी, तुला काहीच जमत नाही, जमणार नाही अशी शिक्षक, नातेवाईक ह्यांच्याकडून सतत केली गेलेली नकारात्मक टिपण्णी. ह्यातून निर्माण होणारा न्यूनगंड, आपण निरुपयोगी असल्याची भावना पुढे प्रगतीच्या आड येऊ शकते. मोठेपणी सगळ्यांसमोर, समूहासमोर बोलताना वाटणाऱ्या भीतीचं मूळ लहानपणी वर्गात मुलांकडून केल्या जाणाऱ्या टिंगलीत किंवा शिक्षकांनी सर्वांसमोर केलेल्या अपमानात असू शकतं. मुलींच्या बाबतीत न कळत्या वयात अनुभवले गेलेले गलिच्छ स्पर्श ह्यांचाही निकोप विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
ज्या मुलांमध्ये अतिरिक्त काल्पनिक भीती वा अस्वस्थता जाणवते ,त्यांच्या बाबतीत पुढील कारणे असू शकतात – १. अनुवंशिकता- ही मुले अतिसंवेदानाशील, हळवी असू शकतात. २.- पालकांपैकी एकजण किंवा दोघेही अस्वस्थ वा असुरक्षित असतात. ३. – पालकांनी मुलांची अनाठायी किंवा अतिरिक्त काळजी घेणं ज्यामुळे मुलांना वास्तवातल्या प्रसंगाला, संघर्षाला तोंड देण्याची क्षमता विकसित होत नाही. ४. – काहीवेळा मुलांच्या दृष्टीने निर्माण होणारे दुर्दैवी प्रसंग उदा. पालकांचा घटस्फोट, घरातील जेष्ठांचा मृत्यू, अपघात, इस्पितळातले किंवा घरातले मोठे आजारपण
सतत आतून वाटणारी अतिरिक्त भीती वा अस्वस्थ असणाऱ्या मुलांमध्ये पुढील लक्षणे जाणवायला लागतात. – १. चंचलपणा, अधीरता वा उतावळेपणा २. – मंद हालचाली ३.- कमी झोप किंवा जास्त झोपणे ४.- तळव्यांना सतत घाम ५.- नॉशिया, डोकेदुखी व पोटदुखीची तक्रार व त्यामुळे शाळेत न जाणे. ६.अभ्यासात एकाग्रता न होऊ शकणे व मार्क्स कमी व्हायला लागणे. ७. चिडचिड करणे, प्रमाणाबाहेर रागावणे. ८. एकटं एकटं रहाणे. इतर मुलांमध्ये न मिसळणे ९. घरी पाहुणे आल्यास बुजणे तसेच सोशल समारंभात भाग घ्यायचा टाळणे
काही मुले काल्पनिकता (fantacy) आणि वास्तविकता (reality) ह्यात फरक करू शकत नाहीत आणि इथेच भीतीचा उगम होतो. कुठलीही भीती किंवा अस्वस्थता जर प्रमाणाबाहेर आहे असं वाटलं तर तातडीने तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. लहान मुलांसाठी ह्या भीती किंवा अस्वस्थतेचं निवारण करण्याच्या खूप चांगल्या उपचार पद्धती असतात. भीतीचं निर्बलीकरण (Systematic Desensitization) म्हणजे सावकाश, पायरी पायरीने भीतीवर मात करण्याच्या पद्धती तज्ञ शिकवू शकतात. लहान मुलांसाठी स्वस्थतेची, तणाव नियोजनाची तंत्रे असतात. ती उपयुक्त ठरू शकतात.
पालकांनी नेमकं काय करायला हवं ? – तर समजून घ्यायला हवं की भीती आपल्यासाठी काल्पनिक असली तरी मुलाला ती खरी भासते. त्यामुळेच त्याला अस्वस्थता येते. अशा स्थितीत खूप आश्वासक, प्रेमळ शब्दात त्याला समजावून सांगावं. त्याला रागावू नये किंवा त्याची चेष्टा करू नये. भीतीवर मात करण्यासाठी त्याला मदत करावी. पण काल्पनिक भीतीला खतपाणी घालू नये. उदा. रात्री झोपताना मुलांना खोलीबाहेर, दुसऱ्या खोलीत किंवा कपाटात भूत आहे असं वाटतं. त्यावेळी मुद्दाम कपाट उघडून “बघ, आत काही भूतबित नाहीय” असं सांगू नये. कारण त्यामुळे भूत असतं पण आत्ता आत काही नाहीय असा अर्थ ते काढू शकतात. त्या ऐवजी भूत नावाची गोष्टच नसते अशा पद्धतीनं समजवावं. तसंच “अंधाराला घाबरण्यासारखं काही नसतं. सूर्य मावळला की प्रकाश नाहीसा होतो. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, प्रकाश नसणे”, ह्या पद्धतीनं समजावून सांगावं.
शिक्षकांचा ह्या बाबतीतला सहभाग फार महत्वाचा आहे. घराप्रमाणेच शाळेमध्येही मुलांना समजून घेणे, धैर्य देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे ह्या गोष्टी शिक्षक करू शकतात. मुलांचा बराचसा वेळ शाळेत जातो. त्यामुळे तेथे त्याला आश्वासक वातावरण मिळणे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरते.
लहानपणीच जर अनाठायी, काल्पनिक भीतीची मुळे खुडली गेली तर सकस व्यक्तिमत्वाचा वृक्ष भविष्यात नक्की बहरू शकतो. आजच्या काळाची ही गरज आहे.